पुणे : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीचा थेट फायदा महापालिका निवडणुकीत भाजपला झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहेत. महापालिका निवडणुकीच्या एकूण मतदानात ४३.१० टक्के मतदान एकट्या भाजपला झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला २३.९९, काँग्रेसला ८.४८, शिवसेना ६.९९, तर शिवसेेनेला (ठाकरे) ४.२० टक्के मतदान झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला केवळ ३.८६ टक्के मतदान झाले आहे.
महापालिकेकडून मतमोजणीनंतरची अंतिम आकडेवारी निश्चित करण्यात आली आहे. त्यातून ही माहिती समोर आली आहे.
शहरातील ४१ प्रभागांतील १६५ जागांसाठी गेल्या आठवड्यात मतदान झाले. त्यामध्ये अ, ब, क, ड अशा प्रत्येक जागेसाठी सुमारे ३५ लाख ५१ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला.
महापालिकेसाठी ५२ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला असून, मतदारांना प्रत्येकी ४ मते द्यायची होती. एकूण ७४ लाख ६३ हजार ८२४ मतदान झाले. त्यात ३२ लाख १८ हजार ६६४ मतदान (४३.१ टक्के) भाजपला झाले आहे. त्यामुळे भाजपचे सुमारे ११९ नगरसेवक निवडून आले आहेत.
त्या खालोखाल सर्वाधिक १७ लाख ८६ हजार १७२ मतदान राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) झाले आहे. तिसऱ्या क्रमांकाची ६ लाख ३२ हजार ९२४ मते काँग्रेसला मिळाली आहेत. शिवसेनेला ५ लाख २२ हजार १३८ मते मिळाली असून, शिवसेना (ठाकरे) पक्षाला ३ लाख ११ हजार ६६९ मते मिळाली असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला २ लाख ८८ हजार २०० मते मिळाली आहेत. उर्वरित मतांमध्ये इतर प्रमुख राजकीय पक्ष, अपक्ष, तसेच नोटाला मिळालेल्या मतांचा समावेश आहे.
तीन प्रमुख पक्षांपेक्षा ‘नोटा’ अधिक
या निवडणुकीत निवडणूक लढविणाऱ्या काही मोठ्या राजकीय पक्षांपेक्षाही ‘नोटा’ला अधिक मतदान झाले आहे. पुण्यात ‘नोटा’ला एकूण २ लाख २१ हजार २०९ मतदान झाले आहे, तर सर्व अपक्ष उमेदवारांना १ लाख ४७ हजार २७८ मतदान झाले आहे. मनसेला झालेले मतदानही ‘नोटा’पेक्षा कमी असून, ते १ लाख ५५ हजार ७८८ आहे. ‘आप’ला ५० हजार ५७१, बसपाला ३२ हजार ६७ आणि वंचित बहुजन आघाडीला ७९ हजार ८९२ मतदान झाले आहे. दोन्ही शिवसेनेला पडलेली मते एकत्र केल्यास त्यांची एकूण मतदान ८ लाख ३४ हजारांवर १ टक्क्यांवर जाते, तर दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र असते, तर त्यांचे मतदान २० लाखांच्या पुढे म्हणजेच जवळपास २७ टक्क्यांवर जात असल्याने या दोन्ही पक्षातील फुटीचा फायदा भजाप उमेदवारांना झाल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान, अनेक प्रभागांत शिवसेना आणि राष्ट्रवादीचे बाहेर पडलेले गट एकमेकांच्या समोर लढल्याने या दोघांचेही नुकसान झाले आहे. या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या असल्या, तरी दोन्ही पक्षांनी घड्याळ आणि तुतारी चिन्ह घेतल्याने मतदारांमध्ये गोंधळ झाला. एकसंध असताना २०१७ राष्ट्रवादीला ३८ जागा मिळाल्या होत्या. आता एकत्र लढूनही केवळ ३० जागा मिळाल्या आहेत. शिवसेना एकत्र असताना १० जागा आल्या होत्या, तर आता केवळ १ जागा आली आहे.
महाविकास आघाडीलाही फटका
राज्यात महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस (पवार) पक्ष बाहेर पडल्याने शहरात सुमारे ४० ते ४५ जागांवर महाविकास आघाडीला फटका बसला आहे. महाविकास आघाडी म्हणून दोन्ही राष्ट्रवादी, मनसे, शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस एकत्र लढले असते, तर त्यांना मिळालेली मते पाहता या मतांची एकत्र टक्केवारी सुमारे ४२ टक्के होते. त्यामुळे या पक्षांना भाजपला रोखणे शक्य झाले असते.
