पुणे : वाहनांसाठी स्वस्त इंधनाचा पर्याय असलेल्या ‘सीएनजी’च्या किमतीत पुन्हा वाढ झाली असून, सीएनजी आता प्रतिकिलो अडीच रुपयाने महागणार आहे. बुधवारी (२७ मे) मध्यरात्रीपासून एक किलो सीएनजीसाठी ९४ रुपये ७५ पैसे मोजावे लागणार आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह चाकण, तळेगाव, हिंजवडी परिसरातील वाहनधारकांना या दरवाढीचा फटका बसणार आहे.

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून (एमएनजीएल) मे महिन्यात करण्यात आलेली ही दुसरी दरवाढ आहे. यापूर्वी शुक्रवारी (८ मे) मध्यरात्रीपासून ‘सीएनजी’च्या किमतीत प्रतिकिलो दीड रुपयाने वाढ करण्यात आली होती.

सीएनजीसाठी आवश्यक असणाऱ्या नैसर्गिक वायूच्या खरेदी दरात वाढ झाल्यामुळे दरवाढ करणे आवश्यक असल्याचे ‘एमएनजीएल’कडून निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे.

‘वाहनांसाठी सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. मात्र, अद्यापही पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत सीएनजी हा इंधनाचा स्वस्त पर्याय आहे. अद्यापही सीएनजीमुळे प्रवासी चारचाकी वाहनधारकांना पेट्रोलच्या तुलनेत सुमारे ४८ टक्के आणि डिझेलच्या तुलनेत सुमारे २६ टक्के बचत करता येते. रिक्षाचालकांना सुमारे २६ टक्के बचत करता येते,’ असे ‘एमएनजीएल’ने म्हटले आहे.

दरम्यान, केवळ वाहनधारकांसाठी सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली असून, घरगुती पीएनजीच्या किमतीत वाढ करण्यात आली नसल्याचे ‘एमएनजीएल’कडून स्पष्ट करण्यात आले.