पुणे : CNG Price Hike – वाहनांसाठी स्वस्त इंधनाचा पर्याय असलेल्या ‘सीएनजी’च्या किमतीत तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली असून, ‘सीएनजी’ आता प्रतिकिलो एक रुपयाने महागणार आहे. आज मध्यरात्रीपासून एक किलो ‘सीएनजी’साठी ९५ रुपये ७५ पैसे मोजावे लागणार आहेत. यापूर्वी ‘सीएनजी’च्या किमतीत ८ मे रोजी प्रतिकिलो दीड रुपयांची आणि २८ मे रोजी प्रतिकिलो अडीच रुपयांची दरवाढ करण्यात आली होती.
दरम्यान, घरगुती ‘पीएनजी’च्या किमतीत ८५ पैशांची वाढ करण्यात आली असून, पीएनजी आता ५० रुपये ६५ पैशांवरून ५१ रुपये ५० पैसे प्रति घनमीटर दराने मिळणार असल्याचे ‘महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड’कडून (एमएनजीएल) कळविण्यात आले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह चाकण, तळेगाव, हिंजवडी परिसरातील ग्राहकांना सीएनजी-पीएनजी दरवाढीचा फटका बसणार आहे.
‘सीएनजी’साठी आवश्यक असणाऱ्या नैसर्गिक वायूच्या खरेदीदरात वाढ झाल्यामुळे दरवाढ करणे आवश्यक असल्याचे ‘एमएनजीएल’कडून निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे. दरम्यान, केवळ वाहनधारकांसाठी ‘सीएनजी’च्या दरात वाढ करण्यात आली असून, घरगुती ‘पीएनजी’च्या किमतीत वाढ करण्यात आली नसल्याचे ‘एमएनजीएल’कडून स्पष्ट करण्यात आले.
‘वाहनांसाठी ‘सीएनजी’च्या दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, अद्यापही पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत ‘सीएनजी’ हा इंधनाचा स्वस्त पर्याय आहे. ‘सीएनजी’मुळे प्रवासी चारचाकी वाहनधारकांना पेट्रोलच्या तुलनेत सुमारे ४७ टक्के आणि डिझेलच्या तुलनेत सुमारे २५ टक्के बचत करता येते. रिक्षाचालकांना सुमारे २५ टक्के बचत करता येते,’ असे ‘एमएनजीएल’ने म्हटले आहे.
