पुणे : गणेशोत्सवाला काही दिवसच बाकी असताना उत्सवाच्या काळातील ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठाने गेल्या २५ वर्षांत गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी लक्ष्मी रस्त्यावर ध्वनिपातळीबाबत केलेल्या अभ्यासानुसार केवळ करोना काळातील दोन वर्षांचा अपवाद वगळता दरवर्षीच ८० डेसिबलपेक्षा अधिक ध्वनिपातळीची नोंद झाली असून, काहीवेळा तर १०० डेसिबलपेक्षाही अधिक ध्वनिपातळी नोंदवली गेल्याचे दिसून येते.
गणेशोत्सवाबाबत महापालिकेत झालेल्या बैठकीवेळी पुणेकर नागरिकाने ध्वनिवर्धकांचा वापर न करण्याची मागणी केली होती. त्यावरून बैठकीत जोरदार वादविवाद झाला. या पार्श्वभूमीवर सीओईपीच्या गेल्या २५ वर्षांतील अभ्यासाच्या आकडेवारीचा आढावा घेतला असता ध्वनिपातळी मर्यादेचे दरवर्षीच उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट होते. सीओईपीतील उपयोजित विज्ञान आणि मानव्यविद्या विभागाचे प्रमुख डॉ. महेश शिंदीकर यांच्या नेतृत्वाखाली गणेश विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्त्यावरील प्रमुख चौकांतील ध्वनिपातळी नोंदींचा उपक्रम राबवण्यात येतो. या उपक्रमातून २५ वर्षांच्या ध्वनिपातळीच्या नोंदी उपलब्ध झाल्या आहेत.
आकडेवारीनुसार २००१मध्ये ९०.७ ध्वनिपातळीची नोंद झाली होती. त्यानंतर सातत्याने ९० डेसिबलपेक्षा अधिक ध्वनिपातळी नोंदवली गेली. २००७मध्ये १०२.६, २००८मध्ये १०१.४, २०१०मध्ये १००.९ डेसिबल ध्वनिपातळी नोंदवली गेली. या कालावधीतील २००९मध्ये ७९.१ ध्वनिपातळीची नोंद झाली होती. २०११ ते २०१९ या कालावधीत सातत्याने ९० डेसिबलपेक्षा अधिक ध्वनिपातळी होती. करोना काळात विसर्जन मिरवणूकच न झाल्याने २०२०, २०२१मध्ये ५९.८ डेसिबल ध्वनिपातळी होती. करोनानंतरच लगेचच २०२२मध्ये १०५.२ डेसिबलचा नवा उच्चांक नोंदवला गेला. तर २०२३ मध्ये १०१.३, २०२४मध्ये ९४.८, २०२५मध्ये ९२.६ डेसिबल ध्वनिपातळी होती. त्यामुळे करोना काळाचा अपवाद वगळता सातत्याने ८० डेसिबलपेक्षा अधिक ध्वनिपातळीची नोंद झाल्याचे दिसून येते.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ध्वनिपातळीचे निकष
- निवासी – दिवसा ५५, रात्री ४५ डेसिबल
- व्यावसायिक क्षेत्र – दिवसा ६५, रात्री ५५ डेसिबल
- औद्योगिक क्षेत्र – दिवसा ७५, रात्री ७० डेसिबल
- शांतता क्षेत्र – दिवसा ५०, रात्री ४० डेसिबल
कोणताही उत्सव कोणालाही त्रासदायक होणार नाही, याची दक्षता सर्वच घटकांनी घेतली पाहिजे. एकूणच आजुबाजूला विविध कारणांनी ध्वनि पातळी वाढली आहे. याचा भवतालातील घटकांसह स्वतःवरही परिणाम होत आहे. पुढील पिढी शांतता, कुजबूज विसरून जाईल का, अशी वेळ जवळ येत आहे. – डॉ. महेश शिंदीकर, उपयोजित विज्ञान आणि मानव्यविद्या विभागाचे प्रमुख, सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठ
