पुणे : सध्या एलपीजी सिलिंडरची टंचाई सुरू असून त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. घरगुती गॅस सिलिंडर व्यावसायिक वापराचा गॅस सिलिंडर आणि उद्योगासाठींचे गॅस सिलिंडर मिळत नसल्याचे चित्र आहे. पुण्यासारख्या शहरात हॉटेल आणि खानावळ बंद पडू लागल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी मोठी घोषणा करत सिलिंडर वाटपाचा प्राधान्यक्रम जाहीर केला आहे. यामुळे सर्वात अडचणीत आलेल्या घटकांना तातडीने सिलिंडर उपलब्ध होणार आहे.
पुणे जिल्ह्यात घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांना त्याचा पुरवठा नियमितपणे केला जात आहे. त्यामुळे गॅस टंचाईबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यातील रुग्णालये, आरोग्य संस्था, आपत्कालीन सेवा तसेच विद्यार्थ्यांच्या शासकीय वसतिगृहांना गॅस सिलिंडरचा पुरवठा प्राधान्याने करण्यात यावा, अशा स्पष्ट सूचनाही प्रशासनाकडून संबंधित वितरक आणि तेल कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. या अत्यावश्यक सेवांमध्ये कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन विशेष लक्ष ठेवून आहे.
पुरेसा साठा उपलब्ध
अलीकडील काही दिवसांत समाज माध्यमावर तसेच विविध माध्यमांमधून गॅस टंचाईबाबत चर्चा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. जिल्ह्यातील सर्व एलपीजी वितरक तसेच प्रमुख तेल कंपन्यांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांना नियमितपणे सिलिंडरचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झालेली नाही, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
कठोर कारवाईचे निर्देश
जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा पुरवठा विभागामार्फत गॅस वितरण व्यवस्थेवर सातत्याने देखरेख ठेवली जात आहे. यासाठी जिल्हास्तर आणि तालुकास्तरावर विशेष फिरती व दक्षता पथके गठित करण्यात आली असून ती विविध गॅस एजन्सी, गोदामे तसेच वितरण केंद्रांची तपासणी करत आहेत. या पथकांमार्फत गॅस सिलिंडरचा साठा, वितरणाची प्रक्रिया तसेच ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सेवांची नियमित पडताळणी केली जात आहे. कोणत्याही वितरकाकडून कृत्रिम टंचाई निर्माण करणे, गॅस सिलिंडर जादा दराने विक्री करणे, साठेबाजी करणे किंवा इतर कोणतीही अनियमितता आढळल्यास संबंधितांविरुद्ध अत्यावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी डुडी यांनी दिला आहे.
संपर्क साधावा
नागरिकांनी गॅस सिलिंडरचा अनावश्यक साठा करून ठेवू नये तसेच कोणत्याही अप्रमाणित संदेशांवर किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही शंका असल्यास संबंधित गॅस वितरक किंवा जिल्हा पुरवठा विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
