तब्बल ६६ कोटी ३० लाख रुपये खर्च करून बांधलेल्या, मंत्रालयानंतरची सर्वांत सुसज्ज हरित इमारत असा लौकिक असलेल्या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाचे ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस – पीओपी’ आच्छादन शुक्रवारी सायंकाळी वादळी वाऱ्यामुळे कोसळले. केवळ चारच वर्षात इमारतीची अशी अवस्था होऊन नाचक्की झाल्याने शनिवारी तातडीने कोसळलेल्या छताच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली. तसेच येत्या आठ दिवसांत हे काम पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला (पीडब्ल्यूडी) दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या स्पर्धेला मराठीचे वावडे!

जिल्हाधिकारी कार्यालयातील ए-विंगमधील चारही मजल्यांचे छताचे पीओपी आच्छादन शुक्रवारी वादळी वाऱ्यामुळे कोसळले. या कोसळलेल्या छताची चित्रफीत समाजमाध्यमांमधून सर्वदूर पोहोचली. परिणामी जिल्हाधिकारी कार्यालयाची एकच नाचक्की झाली. या पार्श्वभूमीवर कंत्राटदाराची झाडाझडती घेण्यात आली असून शनिवारी तातडीने दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आली असून संबंधित कामे येत्या आठ दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी पीडब्ल्यूडीला आणि पीडब्ल्यूडीने संबंधित कंत्राटदाराला दिले आहेत.

हेही वाचा- पुणे : चांदणी चौकातील उड्डाणपूल अखेर स्फोटाने जमीनदोस्त; राडारोडा उचलण्याचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक बंदच

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ए-विंगमधील चारही मजल्यांवरील पीओपी आच्छादन निखळले आहे. मात्र, शुक्रवारच्या पावसात बी-विंगमधील चारही मजल्यांवरील छताच्या आच्छादनाचे नुकसान झालेले नाही. या पार्श्वभूमीवर एकसारखे दिसण्यासाठी बी-विंगमधीलही पीओपी आच्छादन काढण्यात येणार आहे. तसेच भविष्यात अशाप्रकारे छताचे आच्छादन पडू नये म्हणून पीओपीऐवजी वॉल पुट्टी करण्यात येणार आहे. याशिवाय शुक्रवारच्या पावसामुळे इमारतीमधील विद्युत वायरींचेही नुकसान झाले असून ती कामेही प्राधान्याने करण्यात येणार आहेत, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune collector office collapse roof repairing work is underway pune print news dpj
First published on: 02-10-2022 at 09:49 IST