पुणे : अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात शनिवारी (८ ऑगस्ट) मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डाॅ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.

‘मोर्चानिमित्त सकाळी अकरा वाजल्यानंतर वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. मोर्चा संंपल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात येणार आहे. आपत्कालीन सेवा, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने, अत्यावश्यक सेवेतील वाहनांना मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा’, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.

वाहतूक बदल पुढीलप्रमाणे : मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक आरटीओ चौक, जहांगीर हाॅस्पिटल, बंडगार्डन रस्तामार्गे वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी आरटीओ चौकातून इच्छितस्थळी जावे किंवा कुंभारवेस चौकातून इच्छितस्थळी जावे. टपाल कार्यालय चौकातून (जीपीओ) बोल्हाई चौक, मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक किराड चौक, नेहरू मेमोरिअल चौकातून वळविण्यात येणार आहे. पुणे स्टेशनकडून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक अलंकार चित्रपटगृह चौकमार्गे वळविण्यात येणार आहे. नरपतगिरी चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक १५ ऑगस्ट चौक, कमला नेहरु रुग्णालय, पवळ चैाक, कुंभारवेस चौकमार्गे वळविण्यात येणार आहे. बॅनजी चौकातून शाहीर अमर शेख चौकाकडे जाणारी वाहतूक रास्ता पेठेतील पाॅवर हाऊस चौक, नरपतगिरी चौक, १५ ऑगस्ट चौकमार्गे वळविण्यात आली आहे.

वाहने लावण्याची व्यवस्था

मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांसाठी एसएसपीएमएस प्रशालेच्या मैदानात वाहने लावण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. मालधक्का चौक, बोल्हाई चौक, पुणे स्टेशन, साधू वासवानी चौक, जीपीओ, नरपतगिरी चौक, फोटोझिंक प्रेस, तसेच डाॅ. बॅनर्जी चौक परिसरात वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे.