‘युद्धस्य कथा रम्या’, असे संस्कृत सुभाषित आहे. युद्धाच्या कथा ऐकणे सर्वांनाच आवडते, असा याचा अर्थ. सध्या हीच स्थिती अमेरिेका आणि इस्रायलने इराणविरोधात सुरू केलेल्या युद्धाच्या बाबतीत घडत आहे. या युद्धाच्या सुरस कथा सगळीकडून कानावर पडत आहेत. मात्र, याचवेळी आर्थिक संकटात सापडलेल्या पुण्यातील उद्योगांचा आवाज कोणापर्यंत पोहोचत नसल्याचे चित्र आहे. पश्चिम आशियातील हे युद्ध सुरू झाल्यानंतर देशभरात द्रवरूप पेट्रोलियम वायूची (एलपीजी) टंचाई झाली. या टंचाईमुळे गॅस वितरकांच्या कार्यालयाबाहेर नागरिकांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहे. जनतेकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्याने सरकारने तातडीने घरगुती एलपीजी पुरवठ्याला प्राधान्य जाहीर केले. याचवेळी व्यावसायिक वापराच्या सिलिंडरचा पुरवठा तातडीने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता घरगुती सिलिंडरचा पुरवठा बऱ्यापैकी सुधारला असला तरी व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा दोन आठवड्यांपासून बंदच आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून व्यावसायिक वापराच्या सिलिंडरचा पुरवठा बंद आहे. व्यावसायिक वापराच्या १९ किलोच्या सिलिंडरचा वापर प्रामुख्याने हॉटेल व्यवसायाकडून केला जातो. पुण्याचा विचार करता १० टक्के हॉटेल बंद झाली असून, इतर हॉटेलांकडून व्यवसाय सुरू ठेवण्याची ओढाताण सुरू आहे. अनेक जण काळ्या बाजारातून अडीच ते तीनपट किमतीने सिलिंडर विकत घेत आहेत. तर काहींनी इलेक्ट्रिक आणि कोळसा शेगड्यांचा वापर सुरू केला आहे. सध्या त्यांचीही टंचाई असून त्याही बाजारात उपलब्ध नाहीत. शहरात १२ ते १५ हजार हॉटेल असून, त्यापैकी ९० टक्के हॉटेलांना टंचाईचा फटका बसत आहे. उरलेली १० टक्के हॉटेल ही पाईप्ड नॅचरल गॅसची (पीएनजी) जोडणी असलेली आहेत. एलपीजी टंचाईमुळे या उद्योगात कार्यरत असलेल्या दीड लाख कामगारांचे भवितव्यही टांगणीवर लागले आहे.

व्यावसायिक वापराच्या सिलिंडरचा वापर करणारा आणखी एक मोठा घटक म्हणजे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई). देशात सर्वाधिक एमएसएमई पुणे जिल्ह्यात आहेत. भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनातील (जीडीपी) एमएसएमईच्या एकूण योगदानापैकी एक तृतीयांश पुण्यातील एमएसएमईचे आहे. याचवेळी एकूण एसएसएमई निर्यातीत पुण्याचा वाटा ४५ टक्के आहे. पुण्यातील एमएसएमईवर लाखो कामगार अवलंबून आहेत. मात्र, आता एलपीजी पुरवठा बंद झाल्याने या उद्योगांवर संकट ओढवले आहे. पुण्यात निर्मिती क्षेत्रातील मोठ्या कंपन्या आहेत. या कंपन्यांची पुरवठा साखळी एमएसएमईवर अवलंबून आहे. पर्यायाने आता मोठ्या कंपन्यांनाही फटका बसू लागला आहे. हे चित्र कायम राहिल्यास आगामी काळात पुण्यातील संपूर्ण उद्योग क्षेत्रावर याचे दूरगामी प्रतिकूल परिणाम दिसून येणार आहेत.

गाऱ्हाणे कोण ऐकणार?

पुण्यातील अनेक उद्योग क्षेत्रांना एलपीजी टंचाईचा फटका बसला आहे. अनेक उद्योग संघटनाकडून केंद्रापासून राज्य सरकार ते जिल्हा प्रशासनापर्यंत साकडे घालण्यात आले आहे. मात्र, एलपीजी पुरवठा सुरू करण्याबाबत अद्याप कोणतेही ठोस आश्वासन मिळालेले नाही. एलपीजी पुरवठ्याच्या आशेवर किती दिवस तग धरून राहायचे, असा प्रश्न उद्योगांसमोर आहे. अनेक उद्योगांवर उत्पादन कमी अथवा बंद ठेवण्याची वेळ आली आहे. अशा संकटाच्या काळात आपले गाऱ्हाणे ऐकणारे कोणीच नाही, अशी भावना उद्योग क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

sanjay.jadhav@expressindia.com