पुणे : काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा ‘छात्रों की गूँज’ कार्यक्रमानंतर पुण्यात काँग्रेसला उर्जितावस्था आल्याचे चित्र रंगवण्यात येत असतानाच ‘अंतर्गत गटबाजी’ या काँग्रेसच्या मूळ स्वभावाने डोके वर काढले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी पुणे शहर काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. मात्र, या आंदोलनात मोजके नेते वगळता अन्य नेत्यांनी पाठ फिरविल्याने आंदोलनात पक्षाच्या आवाजाऐवजी अंतर्गत गटबाजी आणि नाराजीची ‘गूँज’ उपस्थितांच्या कानी पडली.
पुण्यात झालेल्या ‘छात्रों की गूँज’ कार्यक्रमाने मरगळलेल्या काँग्रेसमध्ये उत्साह संचारला. राहुल गांधी यांच्या या कार्यक्रमाला तरुण-तरुणींचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी संवाद साधताना पुरुषसत्ताक पद्धतीवर बोट ठेवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत, मोहनलाल खट्टर यांच्या ध्वनिचित्रफिती दाखवून भाजपविरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केेला. त्याचे पडसाद समाजमाध्यमांवरही उमटले. राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्याने तरुणांमधील अस्वस्थतेला राजकीय व्यासपीठ मिळवून दिले. त्यामुळे काँग्रेसच्या या वाढत्या प्रभावाला वेळीच चाप लावण्यासाठी भाजपने पुण्याकडे लक्ष केंद्रित केले. काँग्रेसनेही मरगळ झटकली असल्याचे चित्र निर्माण झाले. मात्र, काँग्रेसचा मूळ स्वभाव उफाळून आला असून, गटबाजीची लागण पुन्हा लागल्याचे दिसून आले आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये माजी आमदार मोहन जोशी, राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी, नगरसेवक अरविंद शिंदे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष शिवा मंत्री, नगरसेवक रफिक शेख, नगरसेविका आसिया मणियार, सुमय्या नदाफ, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष स्वाती शिंदे, युवक काँग्रसचे अध्यक्ष सौरभ अमराळे आदी सहभागी झाले होते. मात्र, अन्य प्रमुख नेत्यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवली. त्यामुळे काँग्रेससाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाले असताना, काँग्रेस मात्र मूळ स्वभाव विसरायला तयार नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
आंदोलनाचा फार्स, जम्बो कार्यकारिणीचीही पाठ?
काँग्रेसने पूर्व विभागची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यामध्ये २२ उपाध्यक्ष, एक खजिनदार, १५ सरचिटणीस, दहा सचिव, दोन संघटक सचिव, एक प्रसिद्धीप्रमुख अशा ५१ जणांचा समावेश आहे. अद्याप पश्चिम विभागाची कार्यकारिणी जाहीर झालेली नाही. पूर्व विभागाचे कागदोपत्री ५१ पदाधिकारी असले, तरी बहुतांश पदाधिकाऱ्यांनीही आंदोलनाकडे पाठ फिरविली. आंदोलनदेखील सुमारे अर्धा तासात आटोपते घेण्यात आले. त्यामुळे आंदोलनाचा फार्स झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
नाराजीचे कारण काय?
काँग्रेसने गटबाजी रोखण्यासाठी शहराचे पूर्व आणि पश्चिम असे दोन विभाग तयार करून दोन्ही विभागांसाठी स्वतंत्र शहराध्यक्ष नेमले आहेत. पूर्व विभागासाठी नगरसेवक प्रशांत जगताप आणि पश्चिम विभागासाठी माजी आमदार दीप्ती चवधरी यांची शहराध्यक्षपदी नेमणूक केली आहे. मात्र, तरीही अन्य पदाधिकाऱ्यांमधील नाराजी अद्याप दूर झालेली नाही. या आंदोलनाचे निरोप समाजमाध्यमाद्वारे देण्यात आल्याने नाराजी उफाळून आली. ज्येष्ठ नेत्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांना निरोप देणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनाही समाजमाध्यमाद्वारे संंदेश पाठवून आंदोलनाच्या ठिकाणी येण्यास सांगण्यात आल्याने नाराजी उफाळून आल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.
