पुणे : निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आयोग सत्ताधाऱ्यांच्या तालावर काम करत असल्याचा आरोप करीत पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले

पुणे शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तातडीने
राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. ‘लोकशाहीची नव्हे, तर सत्तेची गुलामी करणाऱ्या निवडणूक आयोगाचा निषेध असो’, अशा घोषणांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला.

मतदार याद्यांमधून कोट्यवधी पात्र मतदारांना वगळणे, निवडणुकीच्या काळात पात्र उमेदवारांना अपात्र ठरविणे तसेच सत्ताधाऱ्यांशी संबंधित अपात्र उमेदवारांना पात्र ठरविणे, असे गंभीर आरोप काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर केले. निवडणूक आयोगाच्या निर्णयांबाबत अन्य दोन निवडणूक आयुक्तांनी गेल्या दहा महिन्यांत १४ वेळा असहमती व्यक्त केल्याचा दावाही आंदोलनकर्त्यांनी केला.

‘निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांच्या दबावापासून मुक्त आणि स्वतंत्र असला पाहिजे. आयोगच सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला गेला, तर लोकशाही व्यवस्थेवरील जनतेचा विश्वासच धोक्यात येईल,’ अशी भूमिका काँग्रेसच्या नेत्यांनी मांडली. त्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्तांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

या संदर्भातील निवेदन उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना देण्यात आले. निवडणूक आयोगाच्या कथित पक्षपाती कारभाराचा निषेध करण्यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर सवाल

मतदार यादी, उमेदवारी अर्जांची छाननी आणि निवडणूक निर्णय या प्रक्रियांमध्ये पारदर्शकता आणि समान निकष असणे आवश्यक आहे. मात्र, आयोगाच्या निर्णयांवरच वारंवार प्रश्न उपस्थित होत असतील, तर त्याची गंभीर दखल घेण्याची गरज आहे, असा दावा काँग्रेसने केला. निवडणूक आयोगाने कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता घटनात्मक स्वायत्तता जपावी, अशी मागणीही करण्यात आली.

‘लोकशाही टिकविण्यासाठी निवडणूक आयोगाची विश्वासार्हता अबाधित राहणे आवश्यक आहे. आयोगाच्या कारभाराबाबत जनतेमध्ये निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत,’ अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

काँग्रेसचे पदाधिकारी आंदोलनात

या आंदोलनात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार मोहन जोशी, ज्येष्ठ नेते गोपाळ तिवारी, नगरसेवक अरविंद शिंदे, शिवा मंत्री, नगरसेविका आसिया मणियार, नगरसेविका सुमय्या नदाफ, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष स्वाती शिंदे, युवक काँग्रेस अध्यक्ष सौरभ अमराळे, अक्षय जैन यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.