काँग्रेसला कोण पराभूत करू शकतो, असा सवाल कोणी केला, तर त्याचे उत्तर आहे अर्थातच काँग्रेस! पुण्यातील काँग्रेसबाबत हे उत्तर तंतोतंत खरे ठरत आले आहे. प्रारंभापासून पक्षांतर्गत गटबाजीची लागण लागलेल्या पुण्यातील काँग्रेसचा पराभव कटकारस्थानी नेतेच करत आले आहेत. हे चित्र बदलण्यासाठी काँग्रेसने ‘संघटन सृजन’ अभियान राबवून पहिल्यांदाच दोन शहराध्यक्ष नेमून समेट घडवून आणला; पण हा निर्णय गटबाजी रोमारोमांत भिनलेल्या काँग्रेसच्या काही नेत्यांच्या पचनी पडला नाही. त्यांनी पहिल्या दिवसापासूनच रंग दाखविण्यास सुरुवात केल्याने काँग्रेसचे संघटन सृजन झाले की विभाजन, असा प्रश्न आता कार्यकर्त्यांना पडू लागला आहे.
काँग्रेस पक्षाचा पाडाव कोण करू शकत नाही, असा एक काळ होता. तो भ्रम भाजपने अनेक ठिकाणी दूर केला; पण तरीही अद्याप काँग्रेस देशातून नेस्तनाबूत होऊ शकलेली नाही. अजूनही अनेक ठिकाणी काँग्रेस तग धरून आहे. त्यामागे काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते आणि काही नेत्यांचे प्रयत्न आहेत. मात्र, पुण्यातील काँग्रेसला प्रारंभापासूनच गटबाजीचा शाप आहे. त्यामुळे कोणताही बदल केला, तरी त्याला विरोध हा होणारच, हे काँग्रेसचे वैशिष्ट्य राहिले आहे. गटबाजी आणि विरोध उफाळून आला, की काँग्रेसचे नेते ‘हे पक्षात लोकशाही असल्याचे लक्षण आहे’ असे सांगत स्वत:ची पाठ थोपटून घेत आले आहेत. मात्र, काँग्रेसमधील ही पक्षांतर्गत लोकशाही कालांतराने एवढी फोफावली, की पक्ष संपायची वेळ आली. तरीही पक्षात लोकशाही असल्याचा दावा काँग्रेसच्या नेत्यांनी सोडलेला नाही. पक्षाची शकले पडली, तरी नेते ते मानायला तयार नाहीत.
पुण्यातील काँग्रेसच्या पूर्वेतिहासावर नजर टाकली, की काँग्रेसमध्ये गटबाजी आणि चढउतार कसे होऊन गेले आहेत, ते समजते. पुण्यात काँग्रेसला १९३८मध्ये तत्कालीन नगरपालिकेत सत्ता मिळाली. मात्र, त्या वेळी काँग्रेसचे नेते डॉ. ना. भि. खरे यांना काँग्रेसमधून निलंबित करण्याचे प्रकरण गाजले. त्याचा परिणाम मतदारांवर झाला आणि १९४५ च्या तत्कालीन नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. तेव्हापासून पुण्यात काँग्रेसच्या गटबाजीला प्रारंभ झाला, तो आजतागायत सुरू आहे. त्यानंतर १९५२ मध्ये महापालिका स्थापन झाल्यावर पहिल्या काही निवडणुकांमध्ये काँग्रेस सत्ता मिळवू शकली नाही. तेव्हा नागरी संघटना प्रभावी ठरल्या. नंतरच्या काळात काकासाहेब गाडगीळ, शंकरराव मोरे यांसारख्या नेत्यांमुळे पक्षाची पाळेमुळे घट्ट झाली. नंतरच्या काळात विठ्ठलराव गाडगीळ, जयंतराव टिळक यांच्यामुळे हा पाया आणखी भक्कम झाला. सुरेश कलमाडी यांच्या काळात पक्षाला सुगीचे दिवस आले. मात्र, तेव्हाही गटबाजी होतीच. त्याचा परिणाम नंतरच्या काळात पक्षाला भोगावा लागला आहे.
ही स्थिती सुधारण्यासाठी काँग्रेसने ‘संघटन सृजन’ हे अभियान घेऊन पक्षांतर्गत बदलाला सुरुवात केली. त्यानुसार पुण्यात पहिल्यांदाच दोन शहराध्यक्ष नेमण्यात आले. शहराच्या पूर्व भागासाठी माजी महापौर प्रशांत जगताप आणि पश्चिम भागासाठी माजी महापौर, माजी आमदार दीप्ती चवधरी यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, ही निवड जाहीर झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून काँग्रेसमध्ये गटबाजी सुरू झाली. या दोन्ही माजी महापौरांनी काँग्रेस भवनात माजी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला, तेव्हा माजी प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार रमेश बागवे हे ज्येष्ठ नेते अनुपस्थित राहिले. त्यामागे त्यांची वैयक्तिक अडचणही असू शकते; पण पक्षात नाराजीचा संदेश गेला.
जगताप आणि चवधरी यांची निवड करण्यात काँग्रेसचे प्रभारी, आमदार सतेज पाटील यांची भूमिका महत्त्वाची होती. आता शहरात त्यांच्या नावाने फलकबाजी करण्यात आली. कोल्हापूरमध्ये काँग्रेसचा पराभव झाला, आता पुण्यातील काँग्रेसला सपाट केल्याची टीका त्या फलकांवरून करण्यात आली. त्यामुळे या फलकांची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.
काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत बदल करण्याबाबत २०२२ पासून केवळ चर्चा सुरू होती. राजस्थानमधील उदयपूर येथे काँग्रेसचे शिबिर झाले होते. त्या शिबिरानंतर राज्यातील काँग्रसने एक आणि दोन जून २०२२ रोजी ‘नवसंकल्प शिबिर’ शिर्डी येथे घेतले. त्यामध्ये ‘एक व्यक्ती एक पद’ असा ठराव झाला होता. तसेच पाच वर्षांहून अधिक कालावधीसाठी पदावर असलेल्या पदाधिकाऱ्यांनी पदे रिक्त करावीत, असा ठराव त्या बैठकीत झाला. त्यानुसार पुण्याचे तत्कालीन शहराध्यक्ष, माजी आमदार रमेश बागवे यांनी राजीनामा दिला. प्रभारी अध्यक्ष म्हणून अरविंद शिंदे यांची नियुक्ती झाली. तेव्हापासून कोणत्या ना कोणत्या कारणावरून पुण्यातील काँग्रेसमध्ये गटबाजी सुरू होती. ही गटबाजी रोखण्यासाठी संघटन सृजन अभियान राबवून आता दोन शहराध्यक्ष नेमण्यात आले आहेत. हा निर्णय घेताना नवीन आणि जुन्यांचा संगम घडवून आणण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांनी केला. जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षातून आले आहेत. त्यांचा शहराच्या पूर्व भागात जनसंपर्क आहे. त्यामुळे त्यांच्याकडे या भागाची जबाबदारी देण्यात आली. माजी आमदार दीप्ती चवधरी या जुन्या नेत्या आहेत. त्यांच्या माध्यमातून महिलेला संधी देण्यात आली. त्यातून समन्वय साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, गटबाजीची लागण झालेल्या काँग्रेसच्या काही नेत्यांनी विरोधाला सुरुवात केली आहे.
लोकसभेपासून स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होईपर्यंत काँग्रेसने पक्षांतर्गत कोणताही बदल केला नाही. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले. काँग्रेसला पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात यश मिळाले नाही. मात्र, आता संघटन सृजनातून बदल केले आहेत. हा निर्णय अद्याप काही नेत्यांच्या पचनी पडलेला दिसत नाही. त्यामुळे काँग्रेसमध्ये ‘संघटन सृजन की विभाजन?’ असे चित्र निर्माण झाले आहे. त्यालाही काही जुनेजाणते नेते हे पक्षात लोकशाही जिवंत असल्याचे लक्षण असे संबोधतील. त्याच भ्रमात काँग्रेस राहिल्यास आगामी काळात काँग्रेसला पराभूत कोण करू शकतो, तर काँग्रेसच!
sujit.tambade@expressindia.com
