पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणूक काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्धार केला आहे. परंतु आघाडीचा प्रस्ताव आल्यास त्यावर पक्ष सदस्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, अशी माहिती माजी मंत्री व काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी केले. या वेळी त्यांनी अजित पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीकाही केली. प्रसारमाध्यमांसमोर बोलताना समविचारी पक्षाबाबत ते बोलतात. मात्र अद्यापपर्यंत त्यांच्याकडून आघाडीचा कोणताही प्रस्ताव आला नाही किंवा चर्चाही झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याबाबत आम्ही प्रस्ताव देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भात आयोजित बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. या वेळी त्यांनी भाजपवरही टीका केली. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी जनतेला मोठ-मोठी आश्वासने दिली. परंतु ही आश्वासने पूर्ण करताना ते दिसत नाहीत. भाजपचे हेच अपयश आम्ही आता जनतेसमोर मांडणार असल्याचे त्यांनी म्हटले. तत्पूर्वी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी मात्र या निवडणुका काँग्रस स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले.