पुणे : दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रस्ताव गटनेत्यांशी चर्चा न करता सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी महापालिका सर्वसाधारण सभेत आणला. त्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), काँग्रेस पक्षामध्ये खडाजंगी झाली. भाजप नगरसेवकांनी संपूर्ण वर्षाचे मानधन, तर ‘राष्ट्रवादी’ने एका महिन्याचे मानधन देण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला.
‘हा प्रस्ताव मांडण्यापूर्वी महापौरांनी सर्व पक्षांच्या गटनेत्यांशी चर्चा करून निर्णय का घेतला नाही,’ अशी विचारणा या वेळी करण्यात आली. ‘राज्यातील दुष्काळी स्थितीमुळे शेतकरी त्रस्त आहे. त्यांना आवश्यक ती मदत करण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली असून, महापालिकेनेदेखील त्यामध्ये योगदान द्यावे,’ अशी मागणी करून भाजपचे धीरज घाटे आणि योगेश मुळीक यांनी ‘सर्व नगरसेवकांनी वर्षभराचे मानधन मुख्यमंत्री दुष्काळग्रस्त सहायता निधीला द्यावे,’ असा प्रस्ताव मांडला. ‘भाजपचे १२६ नगरसेवक वर्षाचे मानधन देतील,’ अशी घोषणाही सभागृहात करण्यात आली.
‘दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कोणाचाही विरोध नाही. मग हा प्रस्ताव मांडण्यापूर्वी महापौर नागपुरे यांनी सर्व गटनेत्यांना विश्वासात घेत चर्चा का केली नाही,’ अशी विचारणा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केली. भाजप दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीच्या मुद्द्याचे राजकारण करीत असल्याचा आरोप विरोधकांनी केला.
नगरसेवक धीरज घाटे यांनी सर्व भाजप नगरसेवकांचे वर्षभराचे मानधन दुष्काळग्रस्त सहायता निधीसाठी देण्याचा प्रस्ताव मांडला. ‘राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन यासाठी देण्यात येईल,’ अशी उपसूचना विरोधी पक्षनेते नीलेश निकम यांनी दिली. ‘सर्व पक्षांच्या वतीने निर्णय घेण्याचा अधिकार भाजपला कोणी दिला,’ असा प्रश्न निकम यांनी उपस्थित केला.
मानधन देताना प्रत्येक नगरसेवकाचे स्वतंत्र संमतीपत्र घेण्याची मागणी काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी केली. ‘प्रत्येकाची आर्थिक स्थिती वेगळी असते. त्यामुळे दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाने आपल्या आर्थिक क्षमतेनुसार योगदान द्यावे,’ असे शिंदे म्हणाले.दरम्यान, ‘दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुणे महापालिकेच्या वतीने पाच कोटी रुपयांचा निधी देण्यात यावा,’ अशी सूचना महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना करण्यात आली.
‘दुष्काळाच्या मदतीवरून राजकारण’
सर्वसाधारण सभेत भूमिका मांडताना काँग्रेसचे गटनेते रामचंद्र कदम यांनी भाजपच्या भूमिकेवर टीका केली. ‘दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी काँग्रेस ठामपणे उभी आहे. मात्र, या विषयावरून भाजप राजकारण करत आहे. महापौरांनी सर्वपक्षीय बैठक बोलावणे आवश्यक होते. त्याऐवजी भाजपने थेट प्रस्ताव मांडून सर्व नगरसेवकांनी वर्षभराचे मानधन द्यावे, अशी भूमिका घेतली. ही पद्धत चुकीची आहे,’ असे कदम म्हणाले. उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी काँग्रेसचे नगरसेवक दुष्काळग्रस्त सहायता निधीला विरोध करत असल्याचा आरोप केला.
