पुणे महापालिकेच्या सर्व साधारण सभेला अधिकारी वारंवार गैरहजर राहत आहे. हा प्रकार वारंवार घडत असल्यामुळे पुढील सभेला सर्व अधिकाऱ्यांनी हजेरी लावावी, अशी अपेक्षा महापौर मुक्ता टिळक यांनी मंगळवारी व्यक्त केली. पुढील मुख्यसभेला सर्व अधिकारी उपस्थित राहतील यांची जबाबदारी पालिका आयुक्तांनी घ्यावी, असे आदेश महापौरांनी उपायुक्त कुणाल कुमार यांना दिले आहेत.

पुणे महापालिकेत महिन्यात एक किंवा दोन सर्व साधारण सभा होतात. तसेच विषय समितीच्या बैठका देखील घेतल्या जातात. मात्र या बैठकींना आधिकारी नसल्याने अनेकदा सभा तहकूब करण्याची वेळ येत. आज पुन्हा एकदा असा प्रकार पाहावयास मिळाला. सर्वसाधारण सभेला अधिकारी उपस्थित नसल्याचे लक्षात येताच महापौर मुक्ता टिळक यांनी हा मुद्द्याकडे गांभिर्याने लक्ष देत पुढील सर्व साधारण सभेला आधिकारी उपस्थित राहिले पाहिजेत, असे आदेश दिले. याची जबाबदारी उपायुक्तांनी घ्यावी, असे देखील त्यांनी सांगितले.

महापौरांनी दिलेल्या आदेशानंतर उपायुक्त अधिकाऱ्यांची कशी शाळा घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. पालिका अधिकाऱ्यांच्याबाबतीत प्रशासकीय कामातील ढिसाळपणा समोर येण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी शहरातील नालेसफाईच्या कामामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. यावेळी देखील महापौरांनी नालेसफाईच्या कामाबद्दल स्पष्टीकरण मागितले होते.