पुणे : अभिजात दर्जा मिळालेल्या मराठी भाषेशी संबंधित अनोख्या पत्त्यांच्या खेळांची निर्मिती करण्यात आली आहे. अर्थवाही मराठी शब्द तयार करणे, मराठी म्हणी तयार करणे अशा प्रकारच्या मनोरंजक खेळांतून नव्या पिढीला मराठीची गोडी लावता येणार असून, भाषिक समृद्धीसह स्मरणशक्ती वाढवण्यासाठीही हे अभिनव पत्ते खेळ उपयुक्त आहेत.

पुण्यातील अश्विनी आणि वसंत देवधर या पुण्यातील दाम्पत्याने मराठी भाषेतील पत्त्यांचे खेळ तयार केले आहेत. देवधर दाम्पत्य बऱ्याच काळापासून कलाकुसरीच्या व्यवसायात कार्यरत आहेत. या पूर्वी त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी कागदी त्रिमितीय प्रारूपे तयार केली. त्यांच्या संकल्पनेला विद्यार्थ्यांसह पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आता त्या पलीकडे जाऊन अत्यंत विचारपूर्वक मराठी भाषेसह इंग्रजी भाषेशी संबंधित पत्त्यांच्या खेळांची निर्मिती केली आहे. त्यात ‘मनायिचे गुंफी’, ‘म्हणतात ना’, ‘लक्ष्यवेध’, ‘माईंडस्केप’ या खेळांचा समावेश आहे.

अश्विनी आणि वसंत देवधर यांनी या अनोख्या पत्त्यांच्या खेळांबाबतची माहिती ‘लोकसत्ता’ला दिली. ‘मनाचिये गुंफी’ हा या खेळात मराठी मुळाक्षरे, जोडाक्षरे, काना, मात्रा, वेलांटी, उकार, इकार, अनुस्वार यांचा समावेश असलेले पत्ते आहेत. या पत्त्यांच्या आधारे अर्थवाही मराठी शब्द तयार करावा लागतो. हा खेळ दोन, चार, सहा, आठ अशा कितीही खेळाडू संख्येत खेळता येऊ शकतो. या खेळात जास्तीत जास्त शब्दसंग्रह पूर्ण करणारा खेळाडू जिंकतो. तर ‘म्हणतात ना’ या खेळात पारंपरिक मराठी म्हणी, वाक्प्रचारांचा वापर करण्यात आला आहे. एकूण चार गटांत वेगवेगळ्या १८ म्हणी आणि त्याचे अर्थ लिहिलेले पत्ते खेळाडूंमध्ये वाटून त्यांच्या योग्य जोड्या जुळवाव्या लागतात. खेळाडूंची पारंगतता वाढत जाईल, तशी इतर गटांतील म्हणींचा समावेश करून खेळात रंगत वाढवता येते.

‘लक्ष्यवेध’ या खेळातील प्रत्येक पत्त्यावर वेगवेगळी आठ चिन्हे आहेत. कोणत्याही दोन पत्त्यांवर किमान एक समान चिन्ह शोधण्याचा हा खेळ आहे. उत्तम निरीक्षण आणि जलद निरीक्षणांतून हव्या तितक्या समान चिन्ह्यांच्या जोड्या मिळवून जिंकावे लागते. तर, ‘माइंडस्केप’ या खेळात इंग्रजी ए ते झेड या अक्षरांच्या सहाय्याने इंग्रजी शब्द तयार करावे लागतात. तसेच, दुहेरी अक्षरे (एसएस, ईई) असलेले पत्तेही समाविष्ट आहेत. पत्त्यावरील चिन्ह किंवा चित्रांनुसार शब्द तयार करणे हे या खेळाचे वैशिष्ट्य आहे, असे त्यांनी सांगितले.

कोणत्याही वयोगटातील स्त्री-पुरुष, लहान मुलांना मराठी भाषेची गोडी लावण्यासाठी पत्त्यांचा खेळ उपयुक्त आहे. परदेशातील, परराज्यांतील मराठी कुटुंबीयांचीही पत्त्यांना मागणी आहे. मनोरंजन किंवा भाषा शिक्षणाच्या पलीकडे या खेळाचा वेगळा उपयोग म्हणजे, लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी स्मरणशक्तीला चालना देण्यासाठीही हे खेळ उपयुक्त आहेत, असेही त्यांनी नमूद केले.