पुणे : वारकरी संप्रदाय, संतांविषयी समाजमाध्यमात अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) प्रवक्ते विकास लवांडे यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बागल यांनी जामीन मंजूर केला.
‘या गुन्ह्याचा तपास अंतिम टप्यात आला आहे. या गुन्ह्यात तीन वर्षांपेक्षा अधिक शिक्षेची तरतूद नाही. त्यामुळे लवांडे यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नाही. तसेच, यातून काही साध्य होणार नाही,’ असे निरीक्षण नोंदवून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बागल यांनी लवांडे यांना जामीन मंजूर केला. ‘गुन्ह्याचे स्वरुप, साक्षीदारांवर दबाब टाकण्याची शक्यता विचारात घेऊन आरोपीला जामीन देताना अटी, शर्ती घालणे योग्य ठरेल. आरोपी न्यायालयाच्या अटींचे पालन करण्यास तयार आहे. भविष्यात अशा प्रकाराचा गुन्हा करू नये, तसेच पुराव्यात छेडछाड करू नये, कायमस्वरुपी वास्तव्याचा पत्ता न्यायालयात सादर करावा,’ या अटी-शर्तींवर न्यायालयाने लवांडे यांना जामीन मंजूर केला.
लवांडे यांच्या वतीने ॲड. मिलिंद पवार यांनी जामीन मिळवण्यासाठी अर्ज सादर केला होता. न्यायालयाने ॲड. पवार यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून लवांडे यांना जामीन मंजूर केला. ॲड. पवार यांना ॲड. सुयोग गायकवाड, ॲड. हर्षवर्धन पवार, ॲड. सारंग बहिरट यांनी सहाय केले.
लवांडे यांची चित्रफीत २९ एप्रिल रोजी समाज माध्यमात प्रसारित झाली होती. या चित्रफितीत लवांडे यांनी वारकरी संप्रदायाविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याची फिर्याद एका महिलेने वाघोली पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणात पुण्यातील अतिरिक्त सत्र न्यायालयाने लवांडे यांना दिलेले अंतरिम अटकपूर्व जामीन संरक्षण काढून घेतले होते. त्यानंतर पोलिसांनी लवांडे यांना या प्रकरणात गुरुवारी (२१ मे) अटक केली. त्यानंतर न्यायालयाने लवांडे यांना येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.
