अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या एकास विशेष न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. छबी माेहन सोनी (वय २५, सध्या मूळ रा. उत्तरप्रदेश) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपी सोनी तेरा वर्षीय मुलीच्या ओळखीचा होता. त्याने विश्वासाला तडा देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. त्यामुळे त्याला कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी विनंती विशेष सरकारी वकील ॲड. अरुंधती ब्रह्मे यांनी युक्तीवादात केली. या खटल्यात सरकार पक्षाकडून आठ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. साक्ष तसेच पुरावे ग्राह्य धरून आरोपी सोनीला न्यायालयाने जन्मठेप आणि तीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

सोनी आणि पीडित मुलीची ओळख होती. घरात कोणी नसल्याची संधी साधून त्याने मुलीवर बलात्कार केला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास मुलीला जीवे मारण्याची धमकी त्याने दिली होती. पीडित मुलगी गर्भवती झाली. त्यानंतर सोनीने मुलीला धमकावून वेळोवेळी बलात्कार केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने याबाबत हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. हवेली पोलीस ठाण्यातील तत्कालिन पोलीसनिरीक्षक अशोक शेळके यांनी या प्रकरणाचा तपास केला होता. न्यायालयीन कामकाजासाठी अधिकारी म्हणून सहायक फौजदार विद्याधर निचित यांनी काम पाहिले. हवालदार सचिन अडसूळ आणि किरण बरकाले यांनी सहाय्य केले.

पीडित मुलीला मनोधैर्य योजनेत मदतीच्या सूचना
राज्य सरकारने बलात्कार प्रकरणातील पीडित महिलेला मदत देण्यासाठी मनोधैर्य योजना जाहीर केली आहे. त्याअंतर्गत पीडित मुलीला दोन लाख रुपये किंवा नियमानुसार शक्य असेल त्यापेक्षा जास्त आर्थिक मदत करावी, अशा सूचना विशेष न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी दिल्या आहेत.