पुणे : कौटुंबिक वादातून दाम्पत्य वेगळे राहत असले, तरी त्याचा परिणाम मुलाचे वडील आणि आजी-आजोबांशी असलेल्या नात्यावर होऊ नये, म्हणून पुणे न्यायालयाने नुकताच महत्त्वपूर्ण आदेश दिला. साडेचार वर्षांच्या मुलाला आठवड्यातून तीन दिवस वडील आणि आजी-आजोबांकडे मुक्काम करण्याची परवानगी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी दीप्ती डी. पाटील यांनी दिली आहे.

कौटुंबिक वादातून एक दाम्पत्य गेल्या दीड वर्षापासून वेगळे राहत आहे. त्यांचा मुलगा दर आठवड्यात तीन दिवस वडील आणि आजी-आजोबांसोबत राहत होता. मात्र, कौटुंबिक वादाचे प्रकरण न्यायालयात दाखल झाल्यानंतर मुलाची वडील, आजी-आजोबांशी आठवड्यातून तीन दिवस होणारी भेट थांबली. मुलाला आठवड्यातून तीन दिवस वडील आणि आजी-आजोबांचा सहवास मिळावा, असा अर्ज ॲड. राणी ढाकणे आणि ॲड. विजयकुमार ढाकणे यांच्यामार्फत न्यायालयात दाखल करण्यात आला. वडिलांच्या मागणीला आईने विरोध दर्शविला. मुलाचे आरोग्य आणि सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. मुलाला वडील आणि आजी-आजोबांकडे ठेवण्यास आईने हरकत घेतली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद न्यायालयाने ऐकला. मुलाचे वय, शाळेचे वेळापत्रक, त्याचे हित विचारात घेता वडिलांकडे मुक्काम केल्यास मुलाच्या हिताला बाधा पोहोचेल, असा निष्कर्ष काढण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत, असे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले. त्यानुसार मुलाला आठवड्यातून तीन दिवस (शुक्रवार, शनिवार, रविवार) वडील आणि आजी-आजोबांसोबत राहण्यास परवानगी देण्यात आली.

मुलाच्या ताब्यासाठी यापूर्वी करण्यात आलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. भेटीच्या मागणीला आईच्या वकिलांनी विरोध केला होता. मुलाचा ताबा आणि मुलाला भेटण्याचा अधिकार या दोन स्वतंत्र बाबी आहेत. ताब्याचा अर्ज फेटाळण्यात आला असला, तरी मुलाच्या भेटीबाबत करण्यात आलेल्या मागणीचा स्वतंत्रपणे विचार करण्यास अडथळा येत नाही, असे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले.