पुणे : आरोपीला समजेल अशा भाषेत अटकेची कारणे न सांगणे पोलिसांना महागात पडले. अटकेची कारणे समजेल अशा भाषेत न सांगणे हे घटनाबाह्य आणि सर्वोच्च न्यायालयाच्या कायदेशीर मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नाेंदविले. महिलेची अटक बेकायदा असल्याचे स्पष्ट करुन तिला तात्काळ सोडून देण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एल. व्ही. श्रीखंडे यांनी दिले.

सांगली जिल्ह्यातील एमआयडी कुपवाड पोलीस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंध कायद्यान्वये (एनडीपीएस ॲक्ट) दाखल गुन्ह्यात हिंजवडी भागात राहणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी अटक केली होती. महिलेची प्रवासी कोठडी (ट्रान्झिट रिमांड) मिळवण्यासाठी पोलिसांनी तिला न्यायालयात हजर केले. आरोपी महिलेच्या वतीने ॲड. मंदार दानवले यांनी युक्तिवाद केला. ‘पोलिसांनी कायदेशीर बाबी,तसेच मुलभूत हक्कांचे उल्लंघन केले’, असे ॲड. दानवले यांनी युक्तिवादात न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

पोलिसांनी अटकेची मराठी भाषेत लिहिली होती. आरोपी महिलेला फक्त हिंदी आणि इंग्रजी भाषा अवगत होती. तिला समजणाऱ्या भाषेत पोलिसांनी अटकेची कारणे दिली नव्हती. अटकेच्या माहितीपत्रावर आरोपी महिलेची स्वाक्षरी नव्हती. या प्रकरणात तिचा पती फरार झाला होता. याबाबतची माहिती त्याला समाज माध्यमातून देण्यात आली होती. पोलिसांनी न्यायालायसमोर मांडलेली बाजू न्यायालयाने फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयाच्या मिहीर राजेश शहा विरुद्ध महाराष्ट्र शासन या न्यायनिवाडच्या दाखल देऊन महिलेचा ‘ट्रान्झिट रिमांड’चा अर्ज फेटाळून लावला.

ॲड. दानवले यांना ॲड. नीलेश प्रजापती, ॲड. ऋषीकेश शेलार, ॲड. अजय ताकवणे, ॲड. अनिकेत जांभुळकर, ॲड. रविराज पाटील, ॲड. श्रीनाथ वाडकर यांनी सहाय केले.

बिबवेवाडीत ‘डिलिव्हरी बाॅय’ला लुटले

बिबवेवाडी परिसरात ऑनलाइन खाद्यपदार्थ घरपोच पोहचविणाऱ्या एका तरुणाला धमकावून लुटण्यात आल्याची घटना घडली. दोन दिवसांपूर्वी धनकवडीत एकाला धमकावून २५ लाखांची रोकड लुटण्यात आल्याची घटना घडली होती.

याबाबत एका तरुणाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण ‘डिलिव्हरी बाॅय’ म्हणून काम करतो. २४ मे रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास तरुण बिबवेवाडी परिसरातून निघाला होता. त्या वेळी दोघांनी त्याला अडवून शिवीगाळ केली. तरुणाला मारहाण करुन त्याच्याकडील पार्सल, कानातील सोन्याची बाळी, मोबाइल संच असा मुद्देमाल हिसकावून नेला. सहायक पोलीस फौजदार एस. डी. गायकवाड तपास करत आहेत.

शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांना लुटण्याच्या घटना वाढल्या आहेत. नागरिकांकडील मोबाइल संच हिसकावणे, तसेच पादचारी महिलांकडील दागिने हिसकावून नेण्याच्या घटना वाढल्या आहेत.