पुणे : बालेवाडी भागातील एका नेमबाजी प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत असलेल्या बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या प्रशिक्षकास विशेष न्यायाधीश आर. एन. हिवसे यांनी तीन वर्षे सक्तमजुरी आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
रुद्रगौडा चनवीरगौडा पाटील (वय २८, रा. साई चौक, पाषाण, मूळ रा. बेळगाव, कर्नाटक) असे शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे. सरकारी पक्षाचा युक्तिवाद, तसेच साक्ष, पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने पाटील याला तीन वर्षे सक्तमजुरी आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास दोन महिने कारावासाची शिक्षा भाेगावी लागेल, असे न्यायालयाने निकालपत्रात म्हटले आहे.
पीडित मुलीची उन्हाळी सुटीत नेमबाजी शिकायची इच्छा होती. तिच्या आईने तिला बालेवाडीतील एका नेमबाजी प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणासाठी पाठविले होते. १४ ते २० मे २०१९ या कालावधीत क्रीडा व्यवस्थापक असलेल्या आराेपी रुद्रगौडा पाटील याने मुलीला चहा, नाश्ता, शीतपेय देण्याचा बहाण्याने तिच्याशी अश्लील कृत्य केले. त्या वेळी मुलीने त्याला प्रतिकार केला. त्यानंतर मुलीने या घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. आईने नेमबाजी प्रशिक्षण केंद्रातील वरिष्ठांना या घटनेची माहिती दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाटील याच्याविरुद्ध कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. कारवाई न झाल्याने आईने याबाबतची तक्रार ईमेलद्वारे नेमबाजी प्रशिक्षण संस्थेकडे केली होती. त्यानंतर पीडित मुलीच्या आजीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
आरोपी पाटीलविरुद्ध हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या खटल्यात सरकार पक्षाकडून सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल, तसेच फिर्यादींकडून ॲड. पुष्कर पाटील आणि ॲड. मयूर धाटावकर यांनी बाजू मांडली. सरकार पक्षाकडून सहा साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. पीडित मुलगी आणि नेमबाजी प्रशिक्षण संस्थेतील अधिकाऱ्यांची साक्ष या खटल्यात महत्त्वाची ठरली. पीडित मुलीला बंदूक व्यवस्थित पकडता येत नव्हती. त्यामुळे प्रशिक्षक पाटील तिला ओरडले. पाटील ओरडल्याने त्यांच्याविरुद्ध खोटी तक्रार दिल्याचा आरोप बचाव पक्षाच्या वकिलांनी युक्तिवादात केला होता.