पुणे : ‘कार्यालयीन कामकाजाच्या पद्धतीत होत असलेले वेगवान बदल आणि संमिश्र कार्यपद्धतीचा वाढता स्वीकार यामुळे देशात को-वर्किंग म्हणजेच कार्यालयीन जागा सहकार्य क्षेत्राची झपाट्याने वाढ होत आहे. सध्या देशातील प्रमुख शहरांमध्ये या क्षेत्रातील प्रवेशाच्या बाबतीत पुणे आघाडीवर आहे. शहरातील एकूण कार्यालयीन जागेपैकी सुमारे १४ ते १६ टक्के जागा या क्षेत्राने व्यापली आहे. या बाबतीत पुण्याने बंगळुरू, मुंबई आणि दिल्लीला मागे टाकले आहे,’ अशी माहिती ‘सीसी अँड कंपनी’चे संस्थापक नीलेश सुळे यांनी दिली.
कार्यालयीन जागा सहकार्य क्षेत्रातील ‘सीसी अँड कंपनी’ने कोथरूड परिसरातील ‘गोखले बिझनेस बे’ येथे १६० आसनक्षमता असलेली सुविधा निर्माण केली आहे. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत सुळे बोलत होते. या प्रसंगी ‘सीसी अँड कंपनी’चे मुख्याधिकारी लोव्हेल प्रभू उपस्थित होते. सुळे म्हणाले, ‘मोठ्या भांडवली गुंतवणुकीची आवश्यकता न भासता चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या कार्यालयीन जागांना व्यवसायांकडून मागणी वाढत आहे.
देशातील एकूण कार्यालयीन जागांच्या व्यवहारांमध्ये कार्यालयीन जागा सहकार्याचे प्रमाण सुमारे २० टक्के आहे. अशा कार्यस्थळांच्या स्वरूपातील कार्यालयीन जागांच्या प्रमाणाच्या बाबतीत भारत जगातील आघाडीच्या बाजारपेठांपैकी एक बनला आहे. नवउद्यमी ( स्टार्टअप) परिसंस्थेसाठी कार्यालयीन जागा सहकार्य हा पर्याय अधिक आकर्षक आणि फायद्याचा ठरत आहे.’
‘पुण्यातील कार्यालयीन जागा सहकार्य क्षेत्राने २०१९ पासून सुमारे ३३ टक्के वार्षिक वाढ नोंदवली आहे. त्यामुळे हे देशातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांपैकी एक ठरले आहे. पुण्यात सुमारे ६० लाख चौरस फूट क्षेत्रफळात ४०० हून अधिक कार्यालयीन जागा सहकार्य केंद्रे असल्याचा अंदाज आहे. यापैकी जवळपास ४० टक्के जागेचा वापर माहिती तंत्रज्ञान (आयटी) आणि बँकिग, वित्तीय सेवा व विमा (बीएफएसआय) क्षेत्रातील कंपन्यांकडून केला जातो. ‘सीसी अँड कंपनी’ची पुण्यात सध्या तीन ठिकाणी केंद्रे असून, त्यांची एकत्रित आसनक्षमता ५०० हून अधिक आहे. आगामी काळात मुंबई, नाशिक, गोवा आणि दुबई यांसारख्या बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्याची कंपनीची योजना आहे,’ असे लोव्हेल प्रभू यांनी सांगितले.
कार्यालयीन जागा सहकार्याचे फायदे
- स्वतंत्र कार्यालयापेक्षा कमी भाडे
- भांडवली खर्चाची आवश्यकता नाही
- विविध क्षेत्रांतील व्यक्तींसमवेत व्यवसायाची संधी
- अत्याधुनिक सुविधांसह सज्ज
- कामातील वेळेची लवचीकता शक्य
- काम आणि व्यक्तिगत आयुष्यातील संतुलन
