पुणे : विविध सण, राजकीय कार्यक्रम आणि सणांनिमित्त काढणाऱ्या येणाऱ्या मिरवणुकांमध्ये ध्वनिप्रदूषण कमी करण्यात कसूर केल्याचा दावा करून पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे.

अखिल भारतीय ग्राहक पंचायत, भारतीय मजदूर संघ, पुणे डिस्ट्रिक्ट सीएचएस अँड अपार्टमेंट्स फेडरेशन, पुणे डिस्ट्रिक्ट रिटेल व्यापारी संघ, श्री स्वामी समर्थ सहकारी संस्था आणि ज्येष्ठ नागरिक विलास लेले यांनी मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी ध्वनिप्रदूषण कमी करण्याबाबत कसूर केल्याने त्यांचे वकील सत्या मुळे यांच्यामार्फत ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

‘विविध धार्मिक सण, राजकीय कार्यक्रमांनिमित्त काढणाऱ्या येणाऱ्या मिरवणुकीमध्ये ध्वनिप्रदूषण होते. २०२३ ते २०२५ या काळात झालेल्या गणेशोत्सवातील मिरवणुकीत लेझर दिव्यांचा, तसेच उच्च क्षमतेच्या ध्वनिक्षेपक यंत्रणेचा वापर करण्यात आला. मुंबई, नाशिक, काेल्हापूर, नाशिकसह राज्यातील वेगवेगळ्या शहरांत मिरवणुकांतील ध्वनिप्रदूषणाची पातळी धोकादायक होती. लेझर दिव्यांमुळे काहींच्या डोळ्यांना इजा झाली. पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस आयुक्तांवर आहे. ध्वनिप्रदूषण कमी करण्याबाबत कर्तव्यात कसूर केल्याने पोलीस आयुक्तांविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली नाही,’ असे याचिकाकर्त्यांनी याचिकेत म्हटले आहे.

‘सर्वोच्च न्यायालयाने ध्वनिप्रदूषणाबाबत नियमावली जाहीर केली आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे उल्लंघन करण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशांचे पालन करणे ही जबाबदारी पोलीस आयुक्तांवर आहे. आदेशाचे पालन न करणे हा न्यायालयाचा अवमान ठरतो. राजकीय नेत्यांचा दबाव किंवा प्रभावामुळे पोलिसांनी कारवाई केली नाही,’ असे ॲड. सत्या मुळे यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे.