आयसीसी वर्ल्ड कप काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्वांनाच वर्ल्ड कपचे क्रिकेट सामने कधी सुरू होणार याची आस लागलेली आहे. २७ वर्षानंतर पुण्यात क्रिकेटचे सामाने होणार आहेत. असं असताना आता पुणेकरांचा आनंद द्विगुणित होणार आहे. कारण वर्ल्ड कप ची ट्रॉफी २६ तारखेला पुण्यात येणार असून त्याची जंगी रॅली काढण्यात येणार आहे. अगदी पुणेकर स्टाईलने ढोल ताशाच्या गजरात या ट्रॉफीच स्वागत केलं जाणार आहे. अशी माहिती एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार यांनी चिंचवडमध्ये दिली आहे. हेही वाचा >>> राष्ट्रवादीच्या बंडावेळी आमदारांना ५० कोटींचं प्रलोभन – अंबादास दानवे रोहित पवार म्हणाले, वर्ल्ड कप ची ट्रॉफी बघण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. ती केवळ व्हीआयपी लोकांनाच बघायला मिळते. परंतु, एमसीएच्या माध्यमातून पुण्यातील क्रिकेट प्रेमी आणि सर्वसामान्य नागरिकांना वर्ल्ड कप ची ट्रॉफी जवळून बघता येणार आहे. त्याचबरोबर फोटो आणि सेल्फी काढता येणार आहे. २६ सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता हॉटेल मॅरेट या ठिकाणाहून ट्रॉफीची रॅली १२ वाजता, वाजत- गाजत सुरू होईल. ती सिम्बॉयसिस कॉलेज मार्गे बीएमसी कॉलेज मार्गे फर्गुसन कॉलेज रोड आणि मग ॲग्रीकल्चर कॉलेज या ठिकाणी थांबणार आहे. तिथे ही ट्रॉफी दोन ते अडीच तास असेल अशी माहिती रोहित पवार यांनी दिली. तिथं क्रिकेटप्रेमी ट्रॉफी सोबत फोटो सेल्फी काढू शकणार आहेत. या रॅलीमध्ये रणजी क्रिकेटचे खेळाडू त्याचबरोबर भारतीय क्रिकेट संघाकडून खेळलेले आजी- माजी खेळाडू सोबत असतील अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे. अगदी महाराष्ट्रीयन स्टाईलने त्याचबरोबर पुणेकर स्टाईलने ढोल ताशाच्या गजरात या ट्रॉफीचं स्वागत केलं जाणार आहे हे आवर्जून रोहित पवार यांनी सांगितलं. त्यामुळे ही ट्रॉफी बघण्यासाठी पुणेकरांनी जास्तीत जास्त गर्दी करावी अस आवाहन त्यांनी केल आहे.