पुणे : पत्नीशी वाद झाल्यानंतर भरधाव मोटार चालवून पोलिसांबरोबर हुज्जत घालणाऱ्या एका मोटारचालकाला साडेचौदा हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. बाणेर पोलिसांनी या प्रकरणी मोटारचालकाविरुद्ध कारवाई करून एका दिवसात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. पोलिसांच्या पाठपुराव्यामुळे न्यायालयाने मद्यपी मोटारचालकाला दोषी ठरवून दंडाची शिक्षा सुनावली.

बाणेर भागातील एका महिलेने २ फेब्रुवारी रोजी पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी केला. ‘माझ्या पतीने मद्यप्राशन केले आहे. तो मला मारहाण करण्याची शक्यता आहे. त्वरित पोलीस मदत पाठवा’, अशी विनंती महिलेने पोलिसांकडे केली. त्यानंतर पोलीस कर्मचारी नीलेश बेलदार हे मदतीसाठी बाणेर परिसरातील इमारतीत गेले. तेव्हा महिलेच्या पतीने पोलीस कर्मचारी बेलदार यांच्याशी असभ्य वर्तन केले. ‘माझी तक्रार पोलिसांकडे का केली? मीच तुला पोलीस ठाण्यात घेऊन जातो’, असे सांगून पतीने महिलेला मोटारीतून बाणेर पोलीस ठाण्यात नेले. मद्याच्या नशेत असलेल्या पतीने भरधाव मोटार चालवून स्वत:सह इतरांच्या जिवाला धोका निर्माण केला. त्यानंतर पोलीस कर्मचारी बेलदार यांनी मोटारचालकाविरुद्ध बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

मद्याच्या नशेत भरधाव मोटार चालविल्या प्रकरणी मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस कर्मचारी संतोष केंद्रे यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात एका दिवसात आरोपपत्र दाखल केले. सरकारी वकील शैलजा घोडेकर यांनी बाजू मांडली. न्यायालयाने सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन मद्यपी मोटारचालकाला साडेचौदा हजार रुपये दंड ठोठावला. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त चुलुमुला रजनीकांत , सहायक आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, सहायक निरीक्षक के. बी. डाबेराव, गणेश रायकर, उपनिरीक्षक गोरक्षनाथ काळे, किसन शिंगे, प्रीतम निकाळजे, अशोक वनवे, रोहित पाथरूट, नीलेश बेलदार यांनी ही कारवाई केली.

मेहुणीवर अत्याचार करणाऱ्याला सक्तमजुरी

पुणे : मेहुणीवर अत्याचार करणाऱ्या एकाला बारामती न्यायालयातील सत्र न्यायाधीश बी. डी. शेळके यांनी दहा वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. याबाबत एका महिलेने बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. १४ जून २०२४ रोजी बारामती परिसरात राहणाऱ्या महिलेच्या घरात ही घटना घडली होती. आरोपी पीडित महिलेचा नातलग आहे. दुपारी दीडच्या सुमारास आरोपी पीडित महिलेच्या घरी आला. त्या वेळी महिलेचे पती कामावर गेले होते. महिलेने आरोपीला चहा दिला. त्यानंतर आरोपीने महिलेला जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केले. या घटनेनंतर घाबरलेल्या महिलेने पतीला या घटनेची माहिती दिली. महिलेने बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील के. एस. नवले यांनी बाजू मांडली.

सरकार पक्षाकडून पाच साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. या खटल्यात पीडित महिलेची साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपीच्या वकिलांनी खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आल्याचा बचाव केला. मात्र, आरोपीचे नातेवाईक पीडितेला या खटल्यात साक्ष बदलण्यासाठी दबाव टाकत असल्याचे पीडित महिलेच्या पतीने न्यायालयात सांगितले. गुन्ह्याचे स्वरूप आणि गांभीर्य विचारात घेऊन आरोपीने एका असहाय्य महिलेवर अत्याचार केले, असे स्पष्ट करून न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली. महिलेच्या पुनर्वसनासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले.