पुणे : बलात्काराच्या गुन्ह्यात फरार झालेल्या आरोपीला लातूर परिसरातून अटक करण्यात आली. भारती विद्यापीठ पोलिसांनी ही कारवाई केली.
काशीराम चंद्रकांत म्हस्कले (वय २२, रा. हरीओम निवास, मांगडेवाडी, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. आरोपीने एका युवतीला जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर युवतीची छायाचित्रे समाज माध्यमात प्रसारित करण्याची धमकी दिली होती.
याबाबत युवतीने फिर्याद दिल्यानंतर आरोपीविरुद्ध मार्च महिन्यात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर म्हस्कले पसार झाला होता. पोलिसांनी तपास सुरू केला. तांत्रिक तपासात आरोपी म्हस्कले हा लातूरमधील खरबवाडी परिसरात असल्याची माहिती मिळाली. भारती विद्यापीठ पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला लातूर परिसरातून अटक केली.
पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास कोडग, सहायक निरीक्षक स्नेहल थोरात, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, पोलीस कर्मचारी मंगेश पवार, सागर बोरगे, मंगेश गायकवाड, महेश बारवकर, किरण साबळे, मितेश चोरमले, नीलेश खैरमोडे, अभिनय चौधरी यांनी ही कारवाई केली.
कोंढव्यात गांजा विकणाऱ्या महिलेसह दोघे अटकेत
कोंढवा परिसरात गांजा विक्री प्रकरणात एका महिलेसह दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून २२ किलो गांजा जप्त करण्यात आला.
यास्मीन करीम शेख (वय ४५), आमीर समीर शेख (वय १९, दोघे रा. शिवनेरीनगर, कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. कोंढव्यातील शिवनेरीनगर परिसरात यास्मीन आणि आमीर शेख हे गांजा विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
आरोपी ओळखीतील काही जणांना गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले. त्यांच्याकडून २२ किलो गांजा जप्त करण्यात आला. पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, उपनिरीक्षक अल्फाज शेख, रवींद्र गावडे, प्रवीण उत्तेकर, सर्फराज देशमुख, कैलास सपकाळ, हनुमंत कांबळे, विशाल मेमाणे यांनी ही कारवाई केली.
