पुणे : श्वान चावल्याने एकाने डोक्यात दगड मारल्याने श्वानाचा मृत्यू झाल्याची घटना बोपोडी भागात घडली. श्वानाला जीवे मारल्या प्रकरणी एका तरुणाविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी एका तरुणाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. याबाबत जीवन भीमसेन सोनवणे (वय ५२, रा. तेली चाळ, जुना मुंबई-पुणे रस्ता, बोपोडी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साेनवणे यांनी ऑगी नावाचे श्वान पाळले होते. आरोपी २७ वर्षीय तरुण हा बोपोडीतील तेली चाळीत राहायला आहे. सोनवणे यांच्या श्वानाने आरोपी तरुणाचा चावा घेतला होता. श्वानाने चावा घेतल्याने तरुण त्याच्यावर चिडला होता. सोमवारी (१५ जून) पहाटे तरुणाने सोनवणे यांच्या श्वानाच्या डोक्यात दगड घातला. गंभीर जखमी झालेल्या श्वानाचा मृत्यू झाल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला. त्यानंतर सोनवणे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.
श्वानाच्या डोक्यात दगड घालून मारल्या प्रकरणी आरोपी तरुणाविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम कलम ११ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक गाडेकर तपास करत आहेत.
विश्रांतवाडी भागात गेल्या महिन्यात सोसायटीच्या आवारात भटक्या श्वानाने सफाई कामगाराचा चावा घेतला होता. त्यानंतर सफाई कामगाराने भटक्या श्वानाला काठीने मारले होते. या घटनेत भटक्या श्वानाचा मृत्यू झाला होता. याबाबत एका प्राणी प्रेमी महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पत्नीच्या छळामुळे एकाची आत्महत्या
पत्नीच्या त्रासामुळे एकाने विषारी ओैषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार पेठेत घडली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन पत्नीसह मुलगा, तसेच मुलीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी पत्नीसह, मुलगी, मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत आत्महत्या करणाऱ्या एकाच्या भावाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या भावाला पत्नी, मुलगी, मुलाने शारिरिक आणि मानसिक त्रास दिला होता. त्यांच्या छळामुळे भावाने विषारी ओैषध पिऊन आत्महत्या केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक दाढे तपास करत आहेत.
