पुणे : आंदेकर टोळीतील पसार गुंडाला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून कोयत आणि मोबाइल संच असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ओम गणेश नगरकर (वय २४, रा. हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या सराइताचे नाव आहे. नाना पेठेतील वर्चस्वाच्या वाद, माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खून प्रकरणानंतर टोळीयुद्ध भडकले. टोळीयुद्धातून बंडू आंदेकर टोळीने प्रतिस्पर्धी सोमनाथ गायकवाड याच्या टोळीतील एकाचा खून केला, तसेच पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजीनगर परिसरात एकावर गोळीबार करुन त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर आंदेकर टोळीतील सराइतांच्या हालचालीवर पोलिसांनी लक्ष ठेवले आहे. आंदेकर टोळीतील नगरकर याच्याविरुद्ध लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तो गंभीर गु्न्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकमधील पोलीस कर्मचारी नीलेश साबळे आणि हेमंत पेरणे यांना मिळाली.

त्यानंतर हडपसर भागातील कॅनाॅलजवळ सापळा लावून नगरकर याला पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून कोयता आणि मोबाइल संच जप्त करण्यात आला. पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित जाधव, उपनिरीक्षक राहुल मखरे, विनोद शिंदे, नीलेश साबळे, हेमंत पेरणे, सिद्धेश्वर वाघमारे, सुहास डोंगरे, संदेश काकडे, अमित जमदाडे, मयूर भोसले, अविनाश दळवी यांनी ही कारवाई केली.