पुणे : गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पुणे-सोलापूर रस्त्यावरील थेऊर परिसरातून अटक केली. या कारवाईत पोलिसांनी ५३ किलो गांज्यासह ४० लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
प्रीतम रविंद्र कुंजीर (वय ३२, रा. धुमाळ मळा, म्हसोबा मंदिराजवळ, थेऊर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरात अमली पदार्थ विक्री करणाऱ्या तस्करांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विभागाचे पथक पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर भागात गस्त घालत होते. त्या वेळी एक जण मोटारीतून गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी थेऊर फाटा परिसरात बुधवारी (११ मार्च) पहाटे सापळा लावला. पहाटे पाचच्या सुमारास मोटारीतून आलेल्या कुंजीरला ताब्यात घेण्यात आले. मोटारीची तपासणी करण्यात आली. तेव्हा मोटारीत गांजा सापडला.
कुंजीर याच्याकडून १० लाख ६० हजार रुपयांचा ५३ किलो गांजा, तसेच ३० लाख रुपयांची महागडी मोटार असा ४० लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथक-एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहायक निरीक्षक अनिल सुरवसे, लोणी काळाभोर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक योगेश पैठणे, पोलीस कर्मचारी विठ्ठल साळुंखे, संजय राजे, रिहान पठाण, अमोल सरडे, निलेश जाधव, विजय कांबळे, मंगेश गुंड, विशाल भिलारे, राहुल शिंदे, अक्षय शिर्के, आशा भिंगारे, अण्णा माने यांनी ही कामगिरी केली.
