पुणे : चंदननगर भागात घरफोडी करून पसार झालेल्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून सोने-चांदीचे दागिने, तसेच रिक्षा असा तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.रोहित नितीन गायकवाड (वय २८, रा. कृष्णानगर, महमदवाडी, हडपसर), मनीष सुजित नागपुरे (रा. सर्वोदय काॅलनी, मुंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. चंदननगर भागात एका सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी ऐवज लांबविल्याची घटना घडली होती. गुन्हा केल्यानंतर चोरटे रिक्षातून पसार झाले होते. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून करण्यात येत होता. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. चोरट्यांनी पसार होताना वापरलेल्या रिक्षाचा क्रमांक पोलिसांना चित्रीकरणात दिसून आला. त्यानंतर पोलिसांनी रिक्षाचा शोध घेतला. आरोपी गायकवाड घरफोडी करुन सोलापूरला पसार झाला होता. तांत्रिक तपासात ही माहिती मिळाल्यानंतर त्याला सोलापूरमधून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने साथीदार नागपुरे याच्या मदतीने गुन्हा केल्याची माहिती दिली. चोरलेल्या दागिन्यांची विक्री चोरट्यांनी हडपसर, वानवडीतील सराफांना विकल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून दागिने, तसेच गु्न्हा करण्यासाठी वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली.

परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त डाॅ. प्रशांत अमृतकर, सहायक आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ट पोलीस निरीक्षक नीलेश बडाख, गु्न्हे शाखेचे निरीक्षक अमोल धस, उपनिरीक्षक किरण नरवडे, पोलीस कर्मचारी मेमाणे, डांगे, कदम, घावटे, किरण घुटे, लहाने, बेंद्रे, तसेच लष्कर वाहतूक विभागातील सहायक फौजदार गणेश येळे, लोकरे यांनी ही कामगिरी केली.

दरोड्याच्या तयारीतील चोरट्यांची टोळी जेरबंद चोरट्यांकडून पिस्तूल, चार काडतूसे, शस्त्रे जप्त

पुणे : दरोड्याच्या तयारीतील चोरट्यांच्या टोळीला गुन्हे शाखेने अटक केली. चोरट्यांकडून देशी बनावटीचे पिस्तूल, चार काडतुसे, सहा तीक्ष्ण शस्त्रे. मिरची पूड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मांजरीतील भापकर वस्ती परिसरात ही कारवाई करण्यात आली.

अजयसिंग अर्जुनसिंग दुधानी (वय २६, रा. भापकर वस्ती, मांजरी, हडपसर), रामजितसिंग रणजितसिंग टाक (वय २७, रा. तुळजाभवानी वसाहत, हडपसर), अभयसिंग सिंकदसिंग जुनी (वय २१, रा. सुखकर्ता काॅलनी, गंगानगर, फुरसुंगी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी त्यांच्याबरोबर असलेल्या तीन साथीदारांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गुन्हे शाखेच्या युनिट सहामधील पोलीस हवालदार अमित कांबळे यांनी मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांजरीतील भापकर वस्ती भागात असलेल्या रेल्वे पुलाजवळ बुधवारी (१० जून) मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास चोरट्यांची टोळी थांबल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. चोरटे वाहन चालकांना लुटणार असल्याची माहिती मिळााली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने तेथे सापळा लावून दुधानी, टाक, जुनी यांना पकडले. झटापटीत त्यांच्याबरोबर असलेले तीन साथीदार अंधारात पसार झाले. अटक करण्यात आलेली चोरटे सराईत आहेत. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, चार काडतुसे, सहा कोयते, मिरची पूड, दोरी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक डिगोळे तपास करत आहेत.