पुणे : अनैतिक संबंधातून महिलेला बॅटने मारहाण करून तिचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना चंदननगर भागात घडली. या प्रकरणी एका वकिलासह, त्याची पत्नी आणि मुलीला अटक करण्यात आली आहे.
‘या प्रकरणी वकील, त्यांची पत्नी आणि मुलीला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत महिलेच्या पतीने फिर्याद दिली आहे’, अशी माहिती चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश बडाख यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वकिलाचे महिलेशी प्रेमसंबंध होते. वकिलाचे चंदननगर भागातील जुन्या मुंढवा रस्त्यावर कार्यालय आहे. संबंधित महिला गेल्या साडेतीन वर्षांपासून त्यांच्या कार्यालयात सहाय्यक म्हणून काम करीत होत्या. गुरुवारी (१६ एप्रिल) सकाळी त्या नेहमीप्रमाणे कार्यालयात आल्या. वकील, त्याची पत्नी आणि मुलीने तिला बॅटने मारहाण केली. तिच्यावर शस्त्राने वार केले. त्यानंतर तिचा मृतदेह पोत्यात ठेवण्यात आला. रात्री आठपर्यंत पत्नी घरी न परतल्याने तिच्या पतीने वकिलाशी संपर्क साधला. तेव्हा संबंधित महिला मैत्रिणीकडे गेल्याचे सांगण्यात आले. पतीने तिच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. मात्र, मोबाइल बंद असल्याचे लक्षात आले. त्यानंतर महिलेचे पती शुक्रवारी सकाळी वकिलाच्या कार्यालयात गेले. तेव्हा कार्यालयाचा दरवाजा उघडा होता आणि त्याची पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. त्यानंतर महिलेच्या पतीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, गु्न्हे शाखेचे सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक, नूतन पवार, पोलीस निरीक्षक नीलेश बडाख यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. चंदननगर पोलिसांनी वकील आणि त्यांच्या मुलीला ताब्यात घेतले, तसेच गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने वकिलाच्या पत्नीला ताब्यात घेतले. खून प्रकरण उघडकीस आल्यानंतर सहा तासांत गुन्ह्याचा छडा लावला. पोलीस निरीक्षक बडाख, खंडणी विरोधी पथकाचे पाेलीस निरीक्षक राम राजमाने आणि पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.
पुणे पोलिसांच्या भरती प्रक्रियेत फसवणुकीचा प्रयत्न
पुणे शहर पोलिसांच्या भरती प्रक्रियेतील वैद्यकीय तपासणीत फसवणुकीचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवार तरुणींविरुद्ध बंडगार्डन पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. वैद्यकीय तपासणीत उमेदवार तरुणीने दुसऱ्या तरुणीला ससून रुग्णालयातील तपासणी प्रक्रियेत थांबविल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी दोन तरुणींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत पोलीस कर्मचारी सुजाता पवार यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहर पोलीस दलात शिपाईपदासाठी एक हजार ६३३ जागांची भरती प्रक्रिया सुरू आहे. मैदानी चाचणी, तसेच लेखी परीक्षा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पात्र उमेदवारांची ससून रुग्णलायात वैद्यकीय तपासणी (मेडिकल टेस्ट) केली जाते. १६ एप्रिल रोजी ससून रुग्णालयात एका उमेदवार तरुणीची नेत्र तपासणी करण्यात आली. त्या वेळी तेथील वैद्यकीय तज्ज्ञांनी उमेदवार तरुणीच्या कागदपत्रांवर शेरा दिला. संबंधित तपासणी प्रकरण हे वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीकडे पाठवावे, असा शेरा देण्यात आला होता.
पोलीस भरती प्रक्रियेत अपात्र ठरविण्याची भीती वाटल्याने १७ एप्रिल रोजी उमेदवार तरुणीने दुसऱ्या एका तरुणीला वैद्यकीय तपासणीच्या रांगेत थांबविले. वैद्यकीय तज्ज्ञांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी या बाबतची माहिती पोलिसांना दिली. शासनाची दिशाभूल करून फसवणूक केल्याप्रकरणी उमेदवार तरुणीसह दोघींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
