पुणे : प्राणीप्रेमावरुन वादाच्या घटना वाढल्या आहेत. पुणे स्टेशन परिसरातील ताडीवाला रस्ता परिसरात लव्हबर्ड आणि मांजरावरुन झालेल्या वादातून शेजाऱ्यांमध्ये हाणामारी झाली आणि प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचले. बंडगार्डन पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी एका विरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अभिषेक सिंग यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक सिंग आणि कुटुंबीय ताडीवाला रस्ता परिसरात राहायला आहे. त्यांनी लव्हबर्डस पाळले आहे. लव्हबर्डसचा पिंजरा त्यांनी घराच्या परिसरात ठेवला होता. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला एक जण सिंग यांच्या घरासमोर राहायला आहे. त्याने मांजर पाळले आहे. मांजर लव्हबर्डसच्या पिंजऱ्याच्या परिसरात फिरत होते. मांजरीने लव्हबर्डसच्या पिंजऱ्याला धक्का दिला होता. त्यामुळे सिंग कुटुंबीय चिंतेत हाेते. त्यानंतर त्यांनी शेजारी राहणाऱ्या आरोपीच्या मांजरावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली.
८ मार्च रोजी सिंग आणि शेजाऱ्यात वाद झाला. दोन्ही कुटुंबीय रस्त्यावर आले. एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली. मारहाणीत सिंग यांना दुखापत झाली. त्यानंतर सिंग यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. या प्रकरणी मांजर पाळणाऱ्या शेजाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात यापूर्वी पाळीव श्वानावरून शेजाऱ्यांमध्ये वाद झाले आहे. श्वान अंगावर आल्याने एकाने थेट पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना पर्वती परिसरात वर्षभरापूर्वी घडली होती, तसेच मुळशी तालुक्यात एकाने श्वानाला फास देऊन त्याला मारल्याची घटना घडली होती.
मोटार चालकांचे लक्ष विचलित करुन चोरी करणारे चोरटे गजाआड
सिग्नलला थांबलेल्या मोटार चालकांचे लक्ष विचलित करुन मोटारीतील मौल्यवान ऐवज, तसेच मोबाइल संच चोरणाऱ्या उत्तर प्रदेशातील दोन चोरट्यांना गुन्हे शाखेने अटक केली. या प्रकरणी रवी ओमप्रकाश कोहली (वय ३८), अफजल कय्यूम अब्बासी (वय ३८, दोघे रा. मेरठ, उत्तर प्रदेश) यांना अटक करण्यात आली. शहरातील वेगवेगळ्या भागात सिग्नलला थांबलेल्या मोटार चालकांचे लक्ष विचलित करुन चोरटे मोटारीतील ऐवज, मोबाइल संच चोरून न्यायचे. मोटारीची काच वाजविल्याने मोटार चालकाचे लक्ष विचलित व्हायचे. चोरटे मोटारीची चाक पायावरुन गेल्याचे बतावणीही करायचे. अशा प्रकारचे गुन्हे घडल्यानंतर फरासखाना पोलिसांनी तपास सुरू केला. चोरटे सोमवार पेठ परिसरातील एका लाॅजमध्ये वास्तव्यास येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी मयूर भोसले, अमित जमदाडे, हेमंत पेरणे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून चोरट्यांना ताब्यात घेतले.
चोरट्यांनी कोथरूड, विमाननगर, शहराच्या मध्यभागात अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलीस निरीक्षक अजित जाधव, मयूर भोसले, अमित जमदाडे, हेमंत पेरणे, अनिकेत बाबर, शशिकांत दरेकर, संदेश काकडे, नीलेश साबळे, ज्योती मुल्का, प्रफुल्ल शेलार यांनी ही कारवाई केली.
