पुणे : समाज माध्यमावरील ओळख दोन महिलांना महागात पडली. परदेशातून भेटवस्तू पाठविण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन महिलांची १२ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक केली.

हडपसर भागातील हांडेवाडी परिसरात राहणाऱ्या एका महिलेची सायबर चोरट्यांनी सात लाख १५ हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध काळेपडळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका ४० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेची समाज माध्यमातून सायबर चोरट्याशी ओळख झाली होती. चोरट्यांनी इंडोनेशियातून बोलत असल्याची बतावणी केली होती. त्यानंतर चोरट्याने महिलेला भेटवस्तू पाठविण्याचे आमिष दाखविले. भेटवस्तू पाठविल्या असून सीमाशुल्क विभागाने (कस्टम) जप्त केल्या आहेत, असे सांगून महिलेला तातडीने एका बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. महिलेने चोरट्याच्या खात्यात पैसे जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्याने त्याचा मोबाइल क्रमांक बंद केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाबर तपास करत आहेत.

दुसऱ्या एका घटनेत विवाहाच्या आमिषाने सायबर चोरट्याने एका महिलेची पाच लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत एका महिलेने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसरा, तक्रारदार ३५ वर्षीय महिला वाघोली भागात राहायला आहे. समाज माध्यमातून महिलेची सायबर चोरट्याशी ओळख झाली. विवाहाचे आमिष दाखवून चोरट्याने महिलेला जाळ्यात ओढले. त्यानंतर भेटवस्तू पाठविण्याचे आमिष दाखवून महिलेकडून पाच लाख ७० हजार रुपये घेतले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड तपास करत आहेत .

हडपसरमध्ये मसाज पार्लरवर छापा- देहविक्रय प्रकरणात पाच तरुणी ताब्यात

पुणे : हडपसर भागात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेने छापा टाकला. या प्रकरणी पाच तरुणींना ताब्यात घेण्यात आले असून, मसाज पार्लरच्या व्यवस्थापक महिलेला अटक करण्यात आली आहे.

आशा मुकेश गोरे (वय ५५, रा. हांडेवाडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. हडपसर भागातील एस. पी. बाॅडी फिटनेस या मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनै्तिक मानवी वाहतूक आणि व्यापार प्रतिबंधक कक्षाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून शहानिशा केली. पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. मसाज पार्लरमधून पाच तरुणींना ताब्यात घेण्यात आले. तरुणींंना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्या प्रकरणी मसाज पार्लरची व्यवस्थापक गोरे हिला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
गुन्ह शाखेचे उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे, उपनिरीक्षक विशांत चव्हाण, पोलीस कर्मचारी ईश्वर आंधळे, तुषार भिवरकर, बबनराव केदार यांनी ही कारवाई केली.