पुणे : डेक्कन जिमखाना परिसरातील एका हाॅटेलसमोर तरुणाच्या डोक्यात शस्त्राने वार करून त्याला मारहाण करण्यात आल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. या प्रकरणी दोन तरुणींसह साथीदाराला अटक करण्यात आली असून, त्यांच्याबरोबर असलेल्या सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

या घटनेत १९ वर्षांचा तरुण जखमी झाला. त्याच्या डोक्यात शस्त्राचे वार करण्यात आले. या प्रकरणी दोन  तरुणी आणि एका तरुणाला अटक करण्यात आली. जखमी तरुणाचे अटक झालेल्या एका तरुणीबरोबर आधी भांडण झाले होते. त्यातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. अटक करण्यात आलेल्या तरुण-तरुणींच्या बरोबर असलेल्या सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हल्ल्यात जखमी तरुणानेच डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणी आणि फिर्यादी ओळखीचे आहेत. सातारा येथे त्यांची काही महिन्यांपूर्वी भांडणे झाली होती. शनिवारी (१५ ऑगस्ट) पहाटे सव्वातीनच्या सुमारास तक्रारदार तरुण हाॅटेलमधून बाहेर पडत होता. त्या वेळी टोळक्याने त्याला अडवले. ‘तू तरुणींना काय बोलला? आमच्याबरोबर चल, तुला दाखवितो,’ अशी धमकी त्याला दिली. तक्रारदार तरुण घाबरून हाॅटेलमध्ये पळाला. त्या वेळी आरोपी तरुणी आणि साथीदारांनी त्याला शिवीगाळ केली. ‘याला मारा, जिवंत सोडू नका,’ अशी धमकी देऊन त्याच्या डोक्यात शस्त्राने वार केला. हाॅटेलमधील खुर्ची त्याला फेकून मारली; तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

डेक्कन जिमखाना भागात ही घटना घडल्याने खळबळ उडाली. या परिसरातील काही हॉटेल रात्री उशिरापर्यंत चालू असताना काही वेळा भांडणे, वादांचे प्रसंग घडतात. त्यामुळे काही हॉटेलवर पूर्वी कारवाईही झाली आहे.