पुणे : कृषी महाविद्यालयातील ‘मेस’मध्ये असलल्या जलशुद्धीकरण यंत्रातून विजेच्या धक्का बसल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर दोषींवर कारवाई, तसेच सुरक्षाविषयक लेखापरीक्षण करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
चैतन्य कुंडलिक चव्हाण (वय २३, रा. डोंगरगाव, ता. आष्टी, जि. बीड) असे मृ्त्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. चैतन्य कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. ॲग्रीकल्चर बिझनेस मॅनजमेंट अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात तो होता. तो ‘ई मेस’ समितीचा सदस्य होता. मेसचे कामकाज सुरळीत चालावे, यासाठी ही समिती काम करते. १४ मार्च रोजी तो कृषी महाविद्यालयातील मेसचे कामकाज तो पाहत होता. त्या वेळी मेसमधील जलशुद्धीकरण यंत्राचे (फिल्टर) काम व्यवस्थित चालते का नाही, याची पाहणी तो करत होता. त्या वेळी अचानक जलशुद्धीकरण यंत्रात वीज प्रवाह उतरला. विजेच्या धक्क्याने तो बेशुद्ध पडला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मंगळवारी त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली आहे. मात्र, अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही, अशी माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली.
गृहप्रकल्पात काम करताना तोल जाऊन पडल्याने मजुराचा मृत्यू
नियोजित गृहप्रकल्पात काम करताना तोल जाऊन पडल्याने बांधकाम मजूर तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना कात्रजमधील आंबेगाव भागात घडली. मजुराला सुरक्षाविषयक साधने न पुरविता दुर्घटनेस जबाबदार ठरल्या प्रकरणी ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. जोतीराम राजाराम शेवाळे (मूळ रा. उमदी, ता. जत, जि. सांगली) असे मृत्युमुखी पडलेल्या मजुराचे नाव आहे. याबाबत शेवाळे याचे चुलतभाऊ याबाबत रामचंद्र सदाशिव शेवाळे यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोतीराम हा आंबेगाव परिसरातील एका नियोजित गृहप्रकल्पाच्या ठिकाणी काम करत होता. सोमवारी (२३ मार्च) तळमजल्यावरील चरात (डक्ट) तो मृतावस्थेत सापडला. इमारतीच्या गच्चावरील काही भाग अर्धवट उघडा होता. तेथे काम करत असताना जोतीराम हा तोल जाऊन पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ठेकेदाराने सुरक्षाविषयक साधने न पुरविल्याने दुर्घटना घडल्याचे जोतीराम याचे चुलतभाऊ रामचंद्र यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी घटनास्थळी भेट दिली.
