पुणे : विजेच्या धक्क्याने सुतारकाम करणाऱ्या कारगिराचा मृत्यू झाल्याची घटना बालेवाडीतील एका नियोजित गृहप्रकल्पाच्या परिसरात घडली. दुर्घटनेस जबाबदार असल्याच्या आरोपावरुन पोलिसांनी ठेकेदारां विरुद्ध गुन्हा दाखल केला.
उज्ज्वल मजुमदार (वय ३२, सध्या रा. लाेटस रिएलटी, उमराणी हाॅस्पिटलसमोर, बालेवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या कारागिराचे नाव आहे. याबाबत मजुमदार याची पत्नी सरस्वती (वय २८) हिने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, बांधकाम करणाऱ्या ठेकेदार कंपनीतील कर्मचारी प्रवीण चंद्रकांत जवळकर, महेंद्र केशव चांडगे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्जल मजुमदार सुतारकाम करतो. बालेवाडीतील एका नियोजित गृहप्रकल्पात तो सध्या काम करत आहे. गृहप्रकल्पाच्या आवारात तो पत्नीसह राहायला आहे. १८ मार्च रोजी दुपारी तीनच्या सुमारास तो गृहप्रकल्पाच्या आवारात सुतारकाम करत होता. त्या वेळी अचानक पाऊस आला. प्लायवूड कापणाऱ्या कटरची वायर गोळा करत असताना विजेचा धक्का मजुमदार याला बसल्याने तो बेशुद्ध पडला. त्याला त्वरीत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
सुतारकाम करणारा पती उज्ज्वल मजुमदार याला सुरक्षाविषयक साधने न पुरविल्याने दुर्घटना घडल्याचे त्याच्या पत्नीने फिर्यादीत म्हटले आहे. दुर्घटनेस जबाबदार ठरल्या प्रकरणी पोलिसांनी ठेकेदारां विरुद्ध गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक केकाण तपास करत आहेत.
गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीतील सराईत गजाआड
गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या सराइताला भारती विद्यापीठ पोलिसांनी पकडले. सराइताकडून देशी बनावटीच्या पिस्तुलासह काडतूस जप्त करण्यात आले. लक्ष्मण दगडू कचरे (वय २२, रा. सच्चईमाताा मंदिराजवळ, कात्रज ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. कचरे याच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गु्न्हे दाखल आहेत. तो कात्रज घाट रस्त्यावर थांबला असून, त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस कर्मचारी मितेश चाेरमले, सागर बोरगे, अभिनय चौधरी यांना मिळाली. कचरे हा गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी सापळा लावून कचरे याला पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले. कचरे याने पिस्तूल कोणाकडून आणले, तसेच त्याने पिस्तूल का बाळगले ? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.
परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार आवारे, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, सचिन सरपाले, महेश बारावकर, मंगेश पवार, नीलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांनी ही कारवाई केली.
