पुणे : भारती विद्यापीठ परिसरातील एका उपाहारगृहात गॅसगळती झाल्यानंतर चार कामगार होरपळले. कामगारांना गंभीर दुखापत झाली नाही.भारती विद्यापीठ परिसरात नादब्रम्ह इडली हे उपाहारगृह आहे. शुक्रवारी सायंकाळी उपाहारगृहात गॅस गळती झाली. भडका उडाल्याने भटारखान्यात काम करणारे चार कामगार होरपळले. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचेपर्यंत नागरिकांनी कामगारांना खासगी रुग्णालयात दाखल केले.
कामगारांच्या हात आणि पायाला किरकोळ स्वरुपाची दुखापत झाली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी गॅस गळती रोखली. गॅस गळती झाल्यानंतर भडाका उडाला. उपाहारगृहातील छताचे नुकसान झाले, तसेच खिडक्यांचा काचा फुटल्या. जवानांनी उपाहारगृहाची पाहणी केली. तेथे व्यावसायिक वापराचे दोन सिलिंडर आढळून आले. गॅसगळती रोखल्यानंतर उपाहारगृहाची पाहणी केली. धोका नसल्याची खात्री केल्यानंतर जवान तेथून रवाना झाले.
डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना कात्रज-कोंढवा रस्त्यावर घडली. अपघातानंतर पसार झालेल्या डंपर चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.अनिकेत राम बनचर (वय २२, रा. सेवक रस्ता, कुंभार वाडा, परभणी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत अनिकेतचा भाऊ अभिषेक (वय २४) याने येवलेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार अनिकेत हा कात्रज-कोंढवा रस्त्यावरुन २६ मार्च रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास निघाला होता. खडी मशीन चौक परिसरात भरधाव डंपरने दुचाकीस्वार अनिकेतला धडक दिली. अपघातात तो गंभीर जखमी झाला. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता डंपर चालक पसार झाला. अनिकेतला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तो मरण पावला होता. पोलीस उपनिरीक्षक पंकज खराडे तपास करत आहेत.
