पुणे : कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाच्या आवारात शिरलेल्या चोरट्यांनी झाडे कापून चोरीचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चोरट्यां विरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सुरक्षारक्षक श्रीपती देवीदास कसबे (वय ३०, रा. शिवनेरीनगर, कोंंढवा) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाच्या आवारात मध्यरात्री चोरटे शिरले. चोरट्यांनी आवरातील चंदनाची चार झाडे कापून नेण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षकांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर चोरटे पसार झाले. यापूर्वी प्राणी संग्रहालयाच्या आवारातून चंदनाची झाडे कापून नेण्यात आल्याच्या घटना घडल्या होत्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे यांनी प्राणीसंग्रहालयास भेट दिली असून, चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. प्राणीसंग्रहालयाच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेेरे बसविण्यात आले आहेत. चित्रीकरण तपासून चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील तपास करत आहेत.

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार व्यावसायिकाचा मृत्यू

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर-सासवड रस्त्यावर ऊरळी देवाची परिसरात घडली. या प्रकरणी ट्रक चालका विरुद्ध फुुरसुंगी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला.

राकेश अंबादास जन्नू (वय ५०, रा. रविराज काॅलेरेडो, कृमार पृथ्वीजवळ, कोंढवा) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. या प्रकरणी ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जन्नू यांचा चुलतभाऊ राहुल (वय ४२) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार राकेश हे हडपसर-सासवड रस्त्याने निघाले होते. भरधाव ट्रकने ऊरळी देवाची परिसरात त्यांना धडक दिल्याची घटना घडली. गंभीर जखमी झालेल्या राकेश यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या ट्रक चालकाचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करत आहेत.

शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गंभीर स्वरुपाच्या वेगवेगळ्या अपघातात पादचाऱ्यांसह दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. आठवडाभरात वेगवेगळ्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. बहुंताश अपघात भरधाव वेगामुळे झाले आहेत.