पुणे : हुंड्यासाठी छळ केल्याने वेगवेगळ्या घटनेत दोन महिलांनी आत्महत्या केल्याची घटना घडल्या. या प्रकरणी कोंढवा आणि आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवाहात हुंडा न दिल्याने महिलेला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याची घटना कोंढवा भागात घडली. या प्रकरणी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पती ऐजाज कुरेशी ताडे (वय २८, रा. जमजम टाॅवर, साईबाबानगर, कोंढवा खुर्द) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी ऐजाजच्या नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, ऐजाज याचा २०२४ मध्ये विवाह झाला. विवाहानंतर हुंडा न दिल्याने ऐजाज आणि त्याच्या नातेवाईकांनी २१ वर्षीय तरुणीचा छळ सुरू केला. छळ असह्य झाल्याने तरुणीने ३१ मे रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तरुणीने आत्महत्या केल्याचे उघडकीस आल्यानंतर तिच्या आईने नुकतीच कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. हुंड्यासाठी छळ केल्याने मुलीने आत्महत्या केल्याचे तिच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक पंकज खोपडे तपास करत आहेत.
प्रेवमिवाहनंतर छळ
प्रेमविवाह केल्यानंतर हुंड्यासाठी छळ केल्याने २० वर्षीय तरुणीने किटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी पतीसह सासू, नणंदेविरुद्ध आंबेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत तरुणीच्या आईने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती मूळचा लातूरमधील आहे. तो सध्या पुण्यात राहायला आहे. फिर्यादी महिलेच्या मुलीने वर्षभरापूर्वी आरोपी तरुणाशी प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर पती, सासू, नणंदेने तरुणीचा हुंड्यसाठी छळ सुरू केला. माहेरहून दागिने घेऊन येण्याची मागणी त्यांनी केली. छळ असह्य झाल्याने तरुणीने किटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. मुलीचा हुंड्यासाठी छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद आईने दिल. पोलीस उपनिरीक्षक डोईफोडे तपास करत आहेत.
