पुणे : किरकोळ वादातून मद्यधुंद मोटार चालकाने प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बस चालकाच्या अंगावर मोटार घातली. मोटारीच्या धडकेत बस चालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना हडपसर-सासवड रस्त्यावरील ऊरळी देवाची परिसरात घडली.
सागर बाळासाहेब सायकर (रा. शेवाळवाडी, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या बस चालकाचे नाव आहे. या प्रकरणी मोटार चालक कृष्णा गोपाळ कोईलवाड (वय ३०, रा. बोथरी, जि. लातूर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत विजय तानाजी शिर्के (वय ४१, रा. सातववाडी, हडपसर) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिर्के आणि सायकर हे प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसवर चालक म्हणून काम करतात. सासवड रस्त्यावरील वडकी नाला भागातील महिलांना दोन बसमधून घेऊन ते रविवारी मध्यरात्री अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी घेऊन जाणार होते. रात्री साडेबाराच्या सुमारास हडपसर-सासवड रस्त्यावर एक मोटार आडवी आली. मोटार चालकाने बसला पुढे जाण्यास जागा दिली नव्हती. त्यामुळे मोटार चालक कोईलवाड याच्याकडे सायकर यांनी विचारणा केली.
बस रस्त्याच्या कडेला थांबवून सायकर यांनी मोटार चालक कोईलवाड याला जाब विचारला. त्या वेळी तेथे अभिजित जमदाडे होते. मद्यधुंद मोटार चालक कोईलवाडने शिवीगाळ करुन मोटार सायकर यांच्या अंगावर नेली. मोटारीने धडक दिल्यानंतर सायकर यांना फरफटत नेले. सायकर यांनी मोटारीचे बाॅनेट पकडले हाेते. ब्रेक लावल्याने सायकर रस्त्यात पडले. अशा परिस्थितीत मोटार चालक कोईलवाडने कोणाताही विचार न करता. पुन्हा त्यांच्या अंगावर मोटार नेली. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्या सायकर यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर पसार झालेल्या मोटार चालकाचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.
रस्त्यावरचे वाद जीवघेणे
शहर परिससरात किरकोळ वादातून वाहन चालकांमध्ये वाद होण्याच्या घटना वाढल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी हडपसर परिसरात टोळक्याने किरकोळ वादातून मोटार चालकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून केल्याची घटना घडली होती. लष्कर भागात श्री छत्रपती शिवाजी मार्केट परिसरातील अरुंद गल्लीत दुचाकी पुढे नेण्याच्या कारणावरुन टोळक्याने दुचाकीस्वार मायलेकींना मारहाण केली होती. या घटनेत त्या गंभी जखमी झाल्या होत्या. बाणेर-पाषाण लिंक रस्त्यावर एका मोटार चालकाने दुचाकीस्वार तरुणीला मारहाण केल्याची घटना घडली होती. किरकोळ वादातून हाणामाऱ्या होण्याच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत.
