पुणे : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पुण्यातील एका भोंदूविरुद्ध वडगाव मावळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर भोंदू पसार झाला आहे.
या प्रकरणी स्वप्नील उर्फ गुरूभाई लांडे (रा. बिबवेवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत पीडित मुलीच्या आईने वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ जुलै रोजी अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता झाली. तिच्या कुटुंबीयांनी ती बेपत्ता झाल्याबाबत वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. मुलगी पुण्यातील बिबवेवाडी भागात राहणारा भोंदू स्वप्नील लांडे याच्या संपर्कात असल्याचे उघडकीस आले होते. अडचणी दूर करतो, असे सांगून लांडेने तिला बिबवेवाडीतील घरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास बोलाविले होते. तेथे मुलीचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वडगाव मावळ पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.
वारजे भागातील भोंदूविरुद्ध ‘अंनिस’ची तक्रार
वारजे भागातील एका भोंदूने महिलांकडून पाय धुऊन घेतल्याची चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित झाली. त्यानंतर या घटनेची दखल घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून वारजे माळवाडी पोलीस टाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला. या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी तक्रार अर्जाद्वारे करण्यात आली आहे.
