पुणे : देशातील नामवंत अवकाश संशोधन संस्थेत वरिष्ठ शास्त्रज्ञ असल्याची बतावणी करुन महिलांची फसवणूक करणाऱ्या एकाला येरवडा पोलिसांनी अटक केली. आरोपी विवाहविषयक संकेतस्थळावरुन महिलांशी ओळख करुन त्यांची फसवणूक करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. आरोपीच्या बँक खात्यातून २१ लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे.

आदर्श प्रशांत म्हात्रे (वय ३४, रा. अलिबाग, जि. रायगड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. आरोपी म्हात्रे स्वप्नील वारुळे, हेमंत गायकर, जयेश पाटील अशी नावे सांगून महिलांची फसवणूक करत होती. याबाबत एका महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीची फिर्यादी महिलेशी विवाहविषयक संकेतस्थळावरुन ओळख झाली होती.

म्हात्रे याने अवकाश संशोधन संस्थेत वरिष्ठ शास्त्रज्ञ असल्याची बतावणी केली होती. त्यानंतर त्याने महिलेला विवाहाचे आमिष दाखविले. महिलेच्या मुलीचा सांभाळ करतो, असे त्याने तिला सांगितले. त्यानंतर त्याने महिलेकडे पैशांची मागणी केली. महिलेने एका बँकेकडून २६ लाख ५० हजार रुपयाे कर्ज काढले. ही रक्कम त्याने आरोपीला दिली. त्यानंतर महिलेने त्याच्याकडे विवाहाबाबत विचारणा केली.

तेव्हा त्याने टाळाटाळ सुरु केली. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासात म्हात्रे हा वेगवेगळ्या नावाने महिलांची फसवणूक करत असल्याची माहिती मिळाली. तो ठाणे जिल्ह्यातील रबाळे पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात अटकेत असल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर येररवडा पोलीस ठाण्याच्या पथकाने त्याला फसवणुकीच्या गुन्ह्यात ताब्यात घेऊन अटक केली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय ठाकर तपास करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून विवाहविषयक संकेतस्थळावरुन महिलांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. विवाहविषयक संकेतस्थळावर नावनोंदणी करताना महिलांनी खातरजमा करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.