पुणे : बुधवार पेठेत आलेल्या तीन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून दोन हजार रुपये घेणाऱ्या फरासखाना पोलीस ठाण्यातील दोन पोलीस शिपायांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन पोलीस शिपायांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका २४ वर्षीय तरुणाने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रादार तरुण हडपसर भागात राहायला आहे. तो एका हाॅटेलमध्ये कामाला आहे. २९ जुलै रोजी तो दोन मित्रांबरोबर शनिवारवाडा पाहण्यासाठी आला होता. तेथून तरुण आणि त्याचे मित्र फिरत फिरत लक्ष्मी रस्ता परिसरात आले. रात्री साडेअकराच्या सुमारास ते बुधवार पेठ परिसरातून निघाले होते. त्या वेळी तेथे नाकाबंदी लावण्यात आली होती. त्या वेळी पोलीस शिपाई दुचाकीवरून तेथे आले. दोघांनी फिर्यादी तरुण आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांना अडवले. त्यांच्याकडे ओळखपत्राची मागणी केली. तेव्हा तिघांनी मोबाइलमधील आधारकार्ड त्यांना दाखविले. त्यानंतर दोघांनी तरुणासह मित्रांना धमकावले.
‘तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल होईल. तुम्हाला न्यायालयात न्यावे लागेल,’ असे शिपायांनी त्यांना सांगितले. तेव्हा तरुण आणि त्याच्याबरोबर असलेले मित्र घाबरले. पोलीस शिपायांनी कारवाई न करण्यासाठी तिघांकडून प्रत्येकी पाच हजार रुपये, असे १५ हजार रुपये मागितले. तेव्हा तरुणाने, ‘आमच्याकडे एवढे पैसे नाहीत. मित्राकडून दोन हजार रुपये ऑनलाइन मागवून घेतो,’ असे सांगितले.
त्यानंतर तरुणाला दुचाकीवरून घेऊन बुधवार पेठेत गेले. तेथील एका ओळखीच्या महिलेच्या मोबाइलवर ऑनलाइन पद्धतीने दोन हजार रुपये पाठविण्यास सांगितले. तरुणाने हाॅटेलच्या मालकाशी संपर्क साधला. अडचणीत असल्याचे सांगून हाॅटेल मालकाला तातडीने दोन हजार रुपये पाठवून देण्यास सांगितले. महिलेच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर, ‘हा प्रकार कोणाला सांगायचा नाही,’ अशी धमकी दोन्ही शिपायांनी तरुणाला दिली.
हा प्रकार घडल्यानंतर तरुण आणि मित्र घरी निघाले. त्यांनी कॅब मागवून घेतली. कॅबचालक तेथे आल्यानंतर त्याला या घटनेची माहिती दिली. कॅबचालकाने याबाबतची चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित केली. त्यामुळे याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली. चौकशीत, दोघांनी बुधवार पेठेत तरुणांना धमकावून पैेसे घेतल्याचे उघडकीस आल्यानंतर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
