पुणे : वैमनस्यातून एकावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना मार्केट यार्ड भागात शुक्रवारी रात्री घडली. गोळीबार एक तरुण जखमी झाला आहे. गुलटेकडीतील मीनाताई ठाकरे वसाहत परिसरातील दोन टोळ्यांमधील वर्चस्वातून गाेळीबार झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या प्रकरणी सराइतांसह सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठवड्यापूर्वी गुलटेकडीत अल्पवयीनांनी पिस्तुलातून गोळीबार करुन दहशत माजविल्याची घटना घडली होती.

मोझेस शेकापुरे उर्फ मोझ्या (वय २२, रा. मीनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलटेकडीतील मीनाताई ठाकरे वसाहतीत उमाप टोळी आणि अमित शेकापुरे यांच्यात वर्चस्वातून वाद आहे. शुक्रवारी दुपारी बालाजी उमाप आणि अमित शेकापुरे यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर शुक्रवारी (६ मार्च) रात्री साडेअकराच्या सुमारास अमित शेकापुरे याचा भाऊ मो्झेस आणि त्याचा मित्र हे दुचाकीवरुन मार्केट यार्डातील वखार महामंडळाकडून गंगाधाम चौकाकडे निघाले होते.

त्या वेळी त्यांच्या मागावर असलेले आरोपी दुचाकीवरुन आले. हल्लेखोरांनी शेकापुरे आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्राला अडवले. आरोपींनी पिस्तुलातून गोळीबार केला. गोळी शेकापूरे याच्या पाठीत शिरल्याने तो गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या शेकापुरेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हल्लेखाेरांना शेकापुरे याच्याबरोबर असलेल्या मित्रावर गोळीबार करायचा होता. मात्र, गोळीबार शेकापुरे जखमी झाल्याची माहिती तपासात मिळाली आहे. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.