पुणे : ‘गे डेटिंग ॲप’वरील ओळखीतून तरुणाशी मैत्री करुन त्याला लुटणाऱ्या चोरट्यांना वारजे पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले. ओम गणेश वाघमारे (वय २०), गणेश उत्तम माने (वय २७, दोघे रा. वारजे माळवाडी), जगदीश रामू पवार (वय २३, रा. शिवणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका तरुणाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रादार २५ वर्षीय तरुण कर्वेनगर भागात राहायला आहे. त्याची एका अल्पवयीनाशी ‘गे डेटिंग ॲप’वरुन ओळख झाली. अल्पवयीनाने त्याला जाळ्यात ओढून कर्वेनगर भागात भेटण्यासाठी बोलाविले. तेथून त्याला दुचाकीवरुन निर्जन ठिकाणी नेले. अल्पवयीनाने तेथे साथीदारांना बोलावून घेतले. अल्पवयीनाबरोबर असलेल्या साथीदारांनी तरुणाला धमकावून त्याच्याकडून ऑनलाइन पद्धतीने आठ हजार ६०० रुपये घेतले. तरुणाच्या गळ्यातील चांदीची साखळी हिसकावून नेली. त्यानंतर घाबरलेल्या तरुणाने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रा दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक तपास करुन आरोपींना ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक शंकर पाटील तपास करत आहेत.

हवाई दलाच्या तळात बेकायदा प्रवेश करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा हवाई दलाच्या तळात बेकायदा प्रवेश करणाऱ्या एकाविरुद्ध विमानतळ पोलिसंनी गुन्हा दाखल केला. याबाबत हवाई दलातील शिपाई अंकीश त्रिपाठी (वय ३५, रा. विमाननगर) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एका ३५ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला तरुण हा मूळचा उत्तर प्रदेशातील आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिपाठी हे हवाई दलाच्या सुरक्षा विभागात नियुक्तीस आहे. पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर हवाई दलाची जागा आहे. या क्षेत्रात नागरिकांना प्रवेश निषिद्ध आहे. ३ मे रोजी आरोपी नगर रस्त्यावरील सीमाभिंतीवरुन चढून हवाई दलाच्या जागेत प्रवेश करत असल्याचे दिसून आले. त्यानंतर हवाई दलाच्या सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याची चौकशी केली. तेव्हा गुन्हा दाखल करण्यात आलेला तरुण हा मानसिक विकाराने ग्रस्त असल्याचे दिसून आले. पोलीस उपनिरीक्षक पालवे तपास करत आहेत. दोन महिन्यांपूर्वी हवाई दलाच्या जागेत बेकायदा प्रवेश करणारा तरुण सीमाभिंतीवरुन पडल्याने त्याचा पाय फ्रॅक्चर झाल्याची घटना घडली होती.