पुणे : मुंबईतील वस्तू आणि सेवाकर विभागातील (जीएसटी) उच्चपदस्थ अधिकाऱ्याला मोहजालात अडकवून ४२ लाख ८७ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी दोन महिलांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.या बाबत एका ४३ वर्षांच्या अधिकाऱ्याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन महिला, साथीदारांविरुद्ध खंडणी, फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अधिकारी नवी मुंबईतील बेलापूर येथे राहायला आहेत. आरोपी महिला नागपूरमध्ये राहायला आहेत. २०२३ मध्ये जीएसटीतील अधिकाऱ्याची एका महिलेची विवाहविषयक संकेतस्थळावरून ओळख झाली. त्यानंतर आरोपी महिलेने त्यांना विवाहाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. त्यानंतर महिलेने त्यांना वेगवेगळी कारणे सांगून पैसे मागण्यास सुरुवात केली. वैद्यकीय उपचार, तसेच बँकेचे कर्ज, तारण ठेवलेले सोने सोडविणे अशी कारणे सांगण्यात आली.
तक्रारदाराला संशय आल्याने त्यांनी महिलेकडे विचारणा केली, तेव्हा महिलेसह साथीदारांनी त्यांना बलात्काराची फिर्याद पोलिसांकडे दिली जाईल. आयुष्यभर कारागृहात राहावे लागेल, अशी धमकी दिली. अधिकाऱ्याने आरोपी महिलेला वेळोवेळी ४२ लाख ८७ हजार रुपये दिले होते. खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन पुन्हा सात लाख रुपये मागण्यात आले. आरोपींच्या धमकीमुळे घाबरलेल्या अधिकाऱ्याने नुकतीच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने वकिलाची १४ कोटींची फसवणूक
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ वकिलाची १४ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका ६८ वर्षीय ज्येष्ठ वकिलाने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायबर चोरट्यांविरुद्ध माहिती-तंत्रज्ञान, तसेच फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी वकिलाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखविले होते. गुंतवणुकीवर परताव्याचे आमिष दाखवून चोरट्यांनी त्यांना जाळ्यात ओढले. त्यानंतर चोरट्यांच्या बँक खात्यात त्यांनी वेळोवेळी १४ कोटी २५ लाख ६५ हजार रुपये जमा केले. चोरट्यांच्या खात्यात पैसे जमा केल्यानंतर परतावा दिल्याचा संदेश पाठविण्यात आला. प्रत्यक्षात परतावा मात्र देण्यात आला नाही.
परतावा न दिल्याने त्यांनी चोरट्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तो बंद असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. चोरट्यांच्या आमिषाला बळी पडू नये, तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत आलेल्या संदेशाकडे कानाडोळा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
