पुणे : गुलटेकडीतील मीनाताई ठाकरे वसाहत अल्पवयीनांनी दहशत माजविल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. अल्पवयीनांनी देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार केला. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी चौघा अल्पवयीनांना ताब्यात घेतले.

याबाबत एकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलटेकडीतील मीनाताई ठाकरे वसाहत परिसरात शुक्रवारी (२० फेब्रुवारी) रात्री पावणेअकराच्या सुमारास चौघे अल्पवयीन दुचाकीवरुन आले. ‘आम्ही या भागातील भाई आहोत, येथे आमचीच चालणार. या भागात राहायचे असेल तर हप्ता द्यावा लागेल’, असे सांगून अल्पवयीनांनी त्यांच्याकडील पिस्तुल उगारून दहशत माजविली. नागरिकांना शिवीगाळ करुन अल्पवयीनांनी पिस्तुलातून हवेत गोळीबार केला, तसेच अल्पवयीनांनी नागरिकांना शस्त्राचा धाक दाखविला. या घटनेनंतर अल्पवयीन दुचाकीवरुन पसार झाले. गोेळीबाराच्या घटनेनंतर परिसरातील नागरिक भयभीत झाले. त्यांनी या घटनेची माहिती त्वरीत पोलिसांना दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडने तपास सुरू केला. पसार झालेल्या चौघा अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील तपास करत आहेत.

कात्रज भागात डंपरच्या धडकेत महिलेचा मृत्यू

भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावर घडली. या प्रकरणी डंपर चालकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

परिमा हेमंत प्रधान (वय ३८, रा. थ्री ज्वेलस सोसायटी, टिळेकरनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत अभिषक निगडे (वय ३५, रा. कात्रज-कोंढवा रस्ता) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यत फिर्याद दिली आहे. या प्रकरणी डंपर चालक संजय प्रभाकर जाधव (वय २८, रा. मानकर चौक, ऊरळी देवाची, हडपसर-सासवड रस्ता) याच्या विरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडे यांच्या नातेवाईक परिमा प्रधान शुक्रवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास पुणे-सातारा रस्त्यावरुन निघाल्या होत्या. कात्रज चौकातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयासमोर भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिली. अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील पाटील तपास करत आहेत.

बंदी आदेश धुडाकाविण्याचे प्रकार सर्रास

शहरातील प्रमुख रस्त्यावर जड वाहनांवर दिवसा बंदी घालण्यात आली आहे. डंपर, ट्रक, सिमेंट मिक्सर अशी जड वाहने पोलिसांचे आदेश धुडकावत असल्याचे दिसून आले आहे. भरधाव वेग आणि बेदरकारपणामुळे गंभीर अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.