देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे विद्यमान भाजपा नगरसेवक व माजी उपाध्यक्ष विशाल उर्फ जिंकी खंडेलवाल यांच्यावर गेल्या आठवड्यात अज्ञात दोघांनी जीवे ठार मारण्याचा उद्देशाने गोळीबार केला होता. दरम्यान, हा गोळीबार मित्राच्या वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा फलक लावला तो नगरसेवक खंडेलवाल यांनी काढण्यास लावला असल्याच्या संशयावरून गोळीबार केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या किरकोळ कारणावरून नगरसेवकावर जीवघेणा हल्ला करण्यात होता.

या घटने प्रकरणी साबीर समीर शेख वय-१९ आणि साईतेज उर्फ जॉनी शिवा चिंतामल्ला वय-१९ या दोघांना देहूरोड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून गोळीबार केलेल पिस्तुल हस्तगत करण्यात आलं आहे. दोघे ही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर याअगोदर गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे विद्यमान भाजपा नगरसेवक व माजी उपाध्यक्ष विशाल उर्फ जिंकी खंडेलवाल यांच्यावर देहूरोड बाजारपेठ येथील त्यांच्या कार्यालयाच्या समोरच थांबले असता दुचाकीवरून आलेल्या साबीर आणि साईतेज पैकी एकाने पिस्तूलातून त्यांच्या दिशेने गोळी झाडली यात विशाल हे थोडक्यात बचावले. याप्रकरणी देहूरोड पोलीस आरोपींचा शोध घेत होते. आरोपींच्या मित्राचा काही दिवसांपूर्वी वाढदिवस होता, तेव्हा या दोघांनी शुभेच्छा फलक लावला. ते फलक काही तासांनी काढले गेले परंतु, हे फलक नगर सेवक खंडेलवाल यांनी काढल्याचा संशय आरोपींना होता. तसेच मित्र व भाऊ यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये खंडेलवाल यांनी पुढाकार घेऊन गुन्हा दाखल करण्यास मदत केल्याचा आणि देहूरोड बाजारपेठ बंद ठेवल्याचा राग दोन्ही आरोपींच्या मनात होता. याचमुळे दोघांनी खंडेलवाल याना ठार करण्याचा कट रचला. परंतु, पिस्तूलातून झाडलेली गोळी अचूक निशाणा न साधल्याने नगसेवक बचावले. देहूरोड पोलिसांच्या तपासात दोन्ही आरोपी सापडले. सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांच्या पथकाने केली.