पुणे : शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य करुन पसार झालेल्या रिक्षाचालकाला हडपसर पोलिसांनी अटक केली. रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर हडपसर पोलिसांनी २४ तासात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. युुनूस गफार खान (वय ५५, रा. कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याबाबत एका शाळकरी मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, खान याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण अधिनियमान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ मार्च रोजी पीडीत ११ वर्षीय शाळकरी मुलगी शाळेतून घरी निघाली होती. त्या वेळी रिक्षाचालक खान याने मुलीशी अश्लील कृत्य केले. घाबरलेल्या मुलीने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर खान पसार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेतला. खान याला अटक करण्यात आल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले.
या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करुन आवश्यक ते पुरावे संकलित करुन त्याच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी २४ तासात आरोपपत्र दाखल केले. परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, निलेश जगदाळे, सहायक पोलीस निरीक्षक विनोद साने, दत्तात्रय खेडेकर, कानेकर यांनी ही कारवाई केली.
स्वारगेट परिसरात खुनाचा प्रयत्न; वर्षभर पोलिसांना गुंगारा देणारा अटकेत
स्वारगेट परिसरात एकाचा खुनाचा प्रयत्न करून पसार झालेल्या सराइताला गुन्हे शाखेच्या युनिट दाेनने अटक केली. राजसिंग युवराजसिंग जुनी (वय २८, रा. पाटील इस्टेट, मुंबई-पुणे रस्ता, शिवाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गेल्या वर्षी स्वारगेट परिसरात एकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन आरोपी जुनी पसार झाला होता. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी त्याच्याविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो गेले वर्षभर पोलिसांना गुंगारा देत होता. पसार झालेला आरोपी एका इमारतीच्या तळमजल्यावर थांबल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट दोनमधील पोलीस कर्मचारी विशाल दळवी आणि आझिम शेख यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. आरोपीची वैद्यकीय तपासणी करुन त्याला गुन्हे शाखेने स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, साधना ताम्हाणे, संदीप शिर्के, विशाल दळवी, शंकर कुंभार, शंकर नेवसे, आझीम शेख, विजयकुमार पवार, ऋषीकेश व्यवहारे, सद्दाम तांबाेेेळी यांनी ही कारवाई केली.
