पुणे : खाद्यपदार्थ व्यवसायातील स्पर्धेतून उपहारागृह चालकासह दाेघांवर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना महर्षीनगर भागात घडली. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात एकाचे पंजापासून मनगट तुटून वेगळे झाले. भरदिवसा दोघांवर हल्ला करण्यात आल्याची घटना घडल्यानंतर परिसरात घबराट उडाली. किशोर राजू बनसोडे (वय २९), प्रसाद राजेंद्र आजुरे (वय २८, दोघे रा. प्रेमनगर वसाहत, मार्केट यार्ड) अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. याबाबत सुनील राजू बनसाेडे (वय २६) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बनसोडे यांचे महर्षीनगर परिसरात व्यंकटेश्वरा अमृततुल्य आणि व्यंकटेश्वरा वडेवाले उपाहारगृह आहे. आराेपी हा बनसाडे यांच्या उपाहारगृहासमोर दाक्षिणात्य खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करायचा. तो खाद्यपदार्थाची गाडी लावायचा. बनसोडे आणि आरोपी यांच्यात व्यवसायावरुन वाद झाले होते. बनसोडे यांनी त्याला गाडी लावू नको, असे सांगितले होते.

या कारणावरुन थेवर आणि बनसोडे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. शनिवारी दुपारी पावणेएकच्या सुमारास किशोर बनसोडे आणि प्रसाद आजुरे उपाहारृहात होते. आरोपी आणि त्याच्याबरोबर तीन साथीदार तेथे आले. त्यांच्याकडे तीक्ष्ण शस्त्रे, तसेच दांडके होते. वादातून आरोपींनी बनसाेडे आणि आजुरे यांच्यावर शस्त्राने वार करण्यास सुुरुवात केली. त्यांनी केलेला वार हातावर झेलला. त्याचे मनगट तुटले. दोघे जण गंभीर जखमी झाला. भरदिवसा दाेघांवर हल्ला झाल्यानंतर महर्षीनगर परिसरात घबराट उडाली. बनसोडे आणि आजुरे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम, सहायक निरीक्षक अभिजित पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.