हरवलेला तपास : सिंहगडावरुन बेपत्ता झालेल्या तरुणीचे गूढ अखेर उलगडलेच नाही..

कविता ५ नोव्हेंबर २००९ रोजी कंपनीतील सहकाऱ्यांसोबत सिंहगडावर फिरायला गेली होती.

सात वर्षांपूवी सिंहगडावर कंपनीतील सहकाऱ्यांसोबत फिरायला गेलेली कविता चिखली ही २८ वर्षीय तरुणी बेपत्ता झाली. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेली कविता मूळची सातारा जिल्ह्य़ातील क ऱ्हाड तालुक्यातील. शिक्षणानंतर नोकरीच्या शोधात ती पुण्यात आली. शिक्रापूर येथील एका बहुराष्ट्रीय कंपनीत तिला नोकरीदेखील मिळाली. कविता ५ नोव्हेंबर २००९ रोजी कंपनीतील सहकाऱ्यांसोबत सिंहगडावर फिरायला गेली होती. कंपनीतील सहकाऱ्यांनी खास सहल काढली होती. खासगी बसने ते सर्व जण सिंहगडावर गेले. मैत्रिणींसोबत गप्पा मारत निघालेली कविता काही वेळ त्यांच्याबरोबर चालत होती. गप्पा आणि गड पाहण्यात दंग असलेल्या तिच्या सहकाऱ्यांना काही वेळानंतर कविता त्यांच्या बरोबर नाही हे लक्षात आले आणि त्यांनी कविताचा शोध घेण्यास सुरुवात केली.

कविताला शोधण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. सूर्य मावळतीला जाऊ लागल्यानंतर त्यांना कविताच्या बेपत्ता होण्याचे गूढ छळू लागले आणि तिच्या कंपनीतील सहकाऱ्यांनी रात्री सिंहगड रस्त्यावरील हवेली पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना या घटनेची प्राथमिक माहिती त्यांनी दिली. हवेली पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सतीश पाटील, उपनिरीक्षक राजेंद्र पाचोरकर यांनी सिंहगडावरुन तरुणी बेपत्ता होण्याचे प्रकरण गांभीर्याने घेतले आणि तातडीने या घटनेची माहिती तत्कालीन उपविभागीय अधिकारी पोलीस उपअधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांना दिली.

संवेदनशील मनाचा अधिकारी अशी परदेशी यांची ओळख आहे. त्यांनी तातडीने पोलीस ठाणे गाठले आणि ते स्वत: पोलीस निरीक्षक पाटील, पाचोरकर आणि तपासपथकातील पोलिसांची कुमक घेऊन त्वरेने गडावर रवाना झाले. एव्हाना रात्र झाली होती आणि गडावर काळोख होता. या काळोखात बेपत्ता झालेल्या कविताचा शोध घेण्यात अडचणी आल्या. त्यामुळे रात्री शोधमोहीम थांबविण्यात आली. दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळीच पोलिसांचे पथक तेथे पोहोचले. गिरिप्रेमी आणि गिर्यारोहण संस्थेतील काहींना तेथे येण्याची विनंती पोलिसांनी केली. घेरा सिंहगड पट्टय़ातील ग्रामस्थांना पोलिसांनी या घटनेची माहिती दिली. स्थानिक ग्रामस्थांना गडाचा कानाकोपरा माहीत असल्याने त्यांची तपासात मदत घेण्यात आली. कविता गडाच्या ज्या भागातून बेपत्ता झाल्याचा अंदाज होता त्याच्या लगतचा भाग पोलिसांनी पिंजून काढला. गडावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे चौकशी करण्यात आली. भरदिवसा कविता बेपत्ता कशी झाली, असा प्रश्न पोलिसांना देखील पडला. खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून फारशी माहिती उपलब्ध न झाल्याने पोलिसांनी तिच्या सहकाऱ्यांकडे चौकशी करण्यास सुरुवात केली. दरम्यान, तिचा भाऊ क ऱ्हाडहून पुण्यात आला.

सिंहगडावर श्वापदाने केलेल्या हल्ल्यात किंवा गडावरुन दरीत कोसळून कविताचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. ही शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी कडेकपारीत जाऊन शोध घेतला. तपास त्या दिशेने सुरू करण्यात आला. त्यासाठी गिर्यारोहक व स्थानिक ग्रामस्थांची मदत घेण्यात आली. मात्र, कडेकपारी किंवा दरीतदेखील मानवी अवशेष सापडले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा तपासाची दिशा बदलली आणि तांत्रिक तपासावर लक्ष केंद्रित केले. ती वापरत असलेल्या मोबाईल संचाचे स्थळ (टॉवर लोकेशन) पडताळून पाहण्यात आले. त्यातूनही काही निष्पन्न झाले नाही. श्वानपथकाला गडावर पाचारण करण्यात आले. श्वानपथकाने गडावर आलेल्या वाहनतळापर्यंत माग दाखविला. पण पुढे मागमूस लागला नाही. अखेर दहा दिवसांनी सिंहगडावरील ही शोधमोहीम थांबविण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला पण पुढे तपास सुरू राहिला.

कविताच्या बेपत्ता होण्याचे गूढ उकलण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे पोलीस उपअधीक्षक आणि सध्या नागपूर शहर पोलीस दलात परिमंडल दोनचे पोलीस उपायुक्त असलेले रवींद्रसिंह परदेशी म्हणाले, की सलग दहा दिवस कविताला शोधण्यासाठी पोलिसांनी सिंहगडावर मोहीम राबविली होती. सर्व शक्यता गृहीत धरून पोलिसांनी दिवसरात्र तपास केला. मात्र, पोलिसांच्या हाती कोणताही दुवा आला नाही. कविताच्या भावाने पोलिसांना सहकार्य केले. तो स्वत: माझ्या संपर्कात गेले सहा ते सात वर्ष होता. कविताच्या कंपनीतील सहकाऱ्यांकडे चौकशी करण्यात आली होती. तांत्रिक  बाबी तपासात पडताळून पाहिल्या होत्या. बंगळुरूमधील कविताच्या मित्राकडे पोलिसांनी तपास केला होता. एवढेच नव्हे तर त्याच्यावर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले होते. पोलीस दलात भरती झाल्यानंतर अधिकारी म्हणून माझी पुण्यातील ती पहिलीच नेमणूक होती. कविता चिखलीचे बेपत्ता होण्याचे गूढ उलगडता आले नाही, ही सल कायम बोचत राहील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pune crime investigation